११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम
By संजय तिपाले | Updated: December 10, 2025 12:37 IST2025-12-10T12:37:30+5:302025-12-10T12:37:49+5:30
Gadchiroli News: दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य, एरिया कमिटी सदस्य अशी उच्च पदावरील नक्षल्यांचा समावेश आहे.

११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम
गडचिरोली - दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य, एरिया कमिटी सदस्य अशी उच्च पदावरील नक्षल्यांचा समावेश असून, सर्वांवर मिळून ८२ लाखांची बक्षिसे होती.
यापैकी चार माओवादी शस्त्रांसह आणि पूर्ण गणवेशात उपस्थित राहिल्याने कार्यक्रमात कडेकोट सुरक्षा पाहायला मिळाली. या आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यात माओवादी संघटनेला जबरदस्त धक्का बसला असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. कार्यक्रमास अपर महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा,
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, साईकार्तिक, अनिकेत हिरडे तसेच अभियानात सहभागी अधिकारी–जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
रमेश उर्फ भीमा उर्फ बाजू लेकामी (डिव्हीसीएम), भीमा उर्फ सितू उर्फ किरण हिडमा कोवासी (डिव्हीसीएम), पोरीये उर्फ लक्की अडमा गोटा (पीपीसीएम), रतन उर्फ सन्ना मासु ओयाम (पीपीसीएम),कमला उर्फ रागो इरिया वेलादी (पीपीसीएम), पोरीये उर्फ कुमारी भीमा वेलादी (एसीएम), रामजी उर्फ मुरा लच्छु पुंगाटी (एसीएम), सोनू पोडीयाम उर्फ अजय, प्रकाश उर्फ पांडू पुंगाटी, सीता उर्फ जैनी तोंदे पल्लो, साईनाथ शंकर मडे (AOB दलम) यांचा समावेश आहे.
भूपतीच्या आत्मसमर्पणानंतरची सर्वात मोठी कारवाई
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी माओवादी चळवळीतील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी भूपती उर्फ सोनू मल्लोजुला वेनुगोपाल राव याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६१ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. तो धक्का अजूनही ताजा असतानाच आजचे सामूहिक आत्मसमर्पण माओवादी संघटनेसाठी आणखी मोठा हादरा ठरत आहे.
सी–६० चे कौतुक, जवानांचा सत्कार
एकलव्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमहासंचालक रश्मी शुक्ला यांनी सी–६० पथकाच्या धाडसी कामगिरीचे भरभरून कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी–जवानांना त्यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. त्या म्हणाल्या, दंडकारण्यात हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणे ही माजी माओवाद्यांसाठी नवी सुरुवात आहे. उर्वरित नक्षल्यांनीही शस्त्रे खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारावा.
‘प्रोजेक्ट उडान’चे अनावरण, विकासाचा नवा वेध
गडचिरोली पोलिसांनी दुर्गम भागातील नागरिकांसाठी तयार केलेल्या ‘प्रोजेक्ट उडान – वेध विकासाचा’ या मार्गदर्शक पुस्तकाचे अनावरणही महासंचालक शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.