आजपासून दहावीची परीक्षा; ४०० पथकांची कॉपीवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 06:22 IST2024-03-01T06:21:26+5:302024-03-01T06:22:01+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

आजपासून दहावीची परीक्षा; ४०० पथकांची कॉपीवर नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे २७१ भरारी पथके स्थापन केली आहेत. यासह महसूल, ग्रामविकास, पाेलिस दल आणि जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत. राज्यभरात अशी एकूण ४०० भरारी पथके परीक्षा कालावधीत हाेणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत, असेही गाेसावी यांनी सांगितले.
राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला १ मार्च राेजी सुरुवात होणार आहे. २६ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
अर्धा तास आधी पोहोचा
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता अर्धा तास अगाेदर परीक्षा केंद्रावर पाेहाेचावे. सकाळी ११ आणि दुपारी
३ वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येईल, परीक्षेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येईल.