10th, 12th Student Protest: दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर; नागपुरात स्कूल बसची तोडफोड, हुल्लडबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 16:01 IST2022-01-31T15:47:13+5:302022-01-31T16:01:41+5:30
10th, 12th Student Protest for Online Exam: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याच्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून १० वी १२ वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

10th, 12th Student Protest: दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर; नागपुरात स्कूल बसची तोडफोड, हुल्लडबाजी
मुंबई: दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, ऑनलाईन हवी या मागणीसाठी विद्यार्थी राज्यभरात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, उस्मानाबाद, मुंबई, औरंगाबादसह विविध शहरांत विद्यार्थ्यांसह काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे. युट्यूबर हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर हे विद्यार्थी ठिकठिकाणी जमले होते, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांनी नागपूरसह काही भागात हुल्लडबाजी केली. नागपूरमध्ये विटांद्वारे स्कूटल बसच्या काचा फोडण्यात आल्या. विद्यार्थांना पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी विद्यार्थ्यांची मागणी ही ऑफलाईन परीक्षा नको तर ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी होती.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याच्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून १० वी १२ वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचा धोका पाहता बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज नागपुरातील ट्रिलीयम मॉल मेडिकल चौकात आंदोलन केले. राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होवू शकतात. मग, १० वी, १२ वीच्या बोर्ड परीक्षासुद्धा ऑनलाईन व्हायला हव्यात, अशी मागणीपर विनंती या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा गेली २ वर्ष बंद आहेत. व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. परंतू, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पडला आहे. ऑनलाईन क्लासेस प्रत्येकाला अटेंड करणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुटला आहे, अशा विद्यार्थ्यांचा विचार करण्यात यावा, असेही या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेतल्या जाणार आहेत, हा विद्यार्थ्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्याचा इशारा आहे. ह्याबाबत देखील पुर्नविचार करावा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.