१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:50 IST2025-10-24T18:50:33+5:302025-10-24T18:50:59+5:30
व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर काय काम केले पाहिजे, काय अडचणी आहेत ते सोडवण्याचे काम करतो. यावरून इतरांना मिरच्या का झोंबल्या? अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
नागपूर - आमची प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर नजर आहे. कोण काय पोस्ट करतो त्याची माहिती आम्हाला मिळते असं खळबळजनक विधान भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर बावनकुळे यांनी पुन्हा यावर खुलासा केला. भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हॉट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
कशी चालते संपूर्ण यंत्रणा?
पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली जाते. नकारात्मक भावना नष्ट करून सकारात्मकता निर्माण केली जाते. यातून कार्यकर्ते व पार्टी यांच्यातील संवाद अधिक चांगला होतो. त्यामुळे आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे ठरविणारे संजय राऊत कोण आहेत? असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.
तसेच निवडणुकीच्या काळात अनेक निगेटिव्ह - पॉझिटिव्ह बातम्या येत असतात. आमच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट तपासण्याचे काम आमची यंत्रणा करत असते. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे एक लाख ग्रुप पार्टीने तयार केले आहेत व ते सर्व वॉर रूमसोबत जोडलेले आहेत. ही माहिती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहेच. सर्व मेसेज संपूर्ण चेक करतो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर काय काम केले पाहिजे, काय अडचणी आहेत ते सोडवण्याचे काम करतो. यावरून इतरांना मिरच्या का झोंबल्या? अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
विधानसभेपेक्षा अधिक मते घेऊ...
दरम्यान, महाविकास आघाडीत कितीही जुळले तरी महायुती ५१ टक्के मतदान संपूर्ण जिल्हा परिषदा, महापालिका जिंकेल. विधानसभेत जेवढे मत मिळाले त्यापेक्षाही अधिक मते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळतील. एकही जिल्हा परिषद, नगरपालिका महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.