मुंबई - राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीकेचे आसूड ओढले. स्पर्धक कंपनीपेक्षा ३ हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ्यावर पांघरूण घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक प्रश्नांवरून दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मागील पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे राज्यात घडले. ९२४ हत्या झाल्या असून दररोज ६ हत्या होतात. तर ३ हजार ५०६ बलात्कार झाले. या घटनांमध्ये जवळचे लोकं एवढे हिंमत का करतात? असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री यांच्या नागपूर जिल्ह्यात १० हजार ४०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुणे संभाजीनगर, नाशिक येथे अनेक मोठे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र १० क्रमांकावर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रीय असून भाईगिरी सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
अनेक विभागात भ्रष्टचार वाढला आहे.. प्रचारात स्वच्छ प्रशासन म्हणतात मात्र दररोज घोटाळे बाहेर येतात.. सत्ताधारी मंत्री भ्रष्टाचार करत असताना काय करणार असा प्रश्न उपस्थित केला..महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारमधील मंत्र्यांचे समोर आलेल्या विविध घोटाळ्यांबाबत दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारच्या विविध खात्यात भ्रष्टाचार बोकाळलेला असून मंत्री कमिशन शिवाय कोणतं काम करत नसल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. राज्यात शेतकऱ्यांचे हाल सुरू असून महिला भगिनींवर अन्याय आत्याचाराच्या घटना घडत असताना याबद्दल सरकारने मौन धारण केले असून फक्त कंत्राट मिळवण्यात त्यांना रस असल्याची टीका दानवे यांनी केली. सत्ताधारी पक्षातील लोकं अनेक गुन्ह्यात सहभागी असून महिला अत्याचारातही सत्ताधारी पुढे आहेत. राज्यात गुत्तेदार आणि दरोडेखोर यांचे राज्य आले असून कोणत्याच गुन्हेगारांवर कारवाई होत नसून कायद्याचे पालन होत नसल्याबाबत दानवे यांनी गृह खात्यावर ताशेरे ओढले.