"मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 02:38 PM2023-12-12T14:38:09+5:302023-12-12T14:40:11+5:30

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला.

shivraj singh chouhan say i am here do not go anywhere will support new government | "मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

"मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

भोपाळ : मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिवराज सिंह चौहान यांनी मोठे विधान केले आहे. मी कुठेही जात नाही. येथेच राहणार आहे आणि नवीन सरकारला नेहमीच पाठिंबा देईल, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पहिल्यांदा लाडली बहिणींची भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अतिशय भावूक दिसले. तसेच, काही बहिणींनी त्यांना मिठी मारली आणि रडू लागल्या.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. नूतन विधानसभा अध्यक्षांचेही अभिनंदन. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झपाट्याने विकास होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. मी त्याला नेहमीच पाठिंबा देईन." दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणले नाही. मात्र, यादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला होता.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, "आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे. २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मी त्याच सरकारला पुढे नेले. २००८ आणि २०१३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने आमचे सरकार स्थापन झाले. २०१८ मध्येही आमची मतांची टक्केवारी जास्त होती, जागा नक्कीच कमी होत्या. तसेच, २०२३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. यावर मी समाधानी आहे. आज मी येथून निरोप घेत आहे."

दरम्यान, मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आता राज्यात शपथविधीची तयारी सुरू आहे. या सगळ्या दरम्यान शिवराज सिंह चौहान म्हणाले, "आम्हाला बिमारू राज्य मिळाले होते. माझ्यात जेवढे सामर्थ्य होते, तेवढेच मी या राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. उत्तम रस्ते, वीज व्यवस्था आणि कृषी क्षेत्राचा वेगवान विकास केला. मेट्रो-ट्रेनपर्यंत प्रवास केला. तसेच, मेडिकल कॉलेज आणि सीएम रायझ स्कूल बांधण्याचे काम केले. पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न केले. आम्ही जनतेच्या विश्वासावर टिकू शकलो आहोत असे वाटते."

याचबरोबर, शिवराज सिंह चौहान म्हणाले, "माझ्यासाठी महिला सक्षमीकरण हे आता मत मिळवण्याचे साधन राहिलेले नाही. महिलांच्या उत्थानाचा विषय नेहमीच माझ्या मनात राहिला आहे. लाडली लक्ष्मी योजनेमुळे एमपीमध्ये लिंग गुणोत्तर सुधारले आहे. ही जबाबदारी चांगल्या सरकार आणि चांगल्या नेतृत्वावर सोपवून आम्ही पुढे जाऊ. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या उन्नतीसाठी मी काम करत राहीन. माझे आणि जनतेचे नाते कधीच मुख्यमंत्र्यांचे राहिले नाही, तर ते मामा-भावाचे राहिले आहे. मी श्वास असेपर्यंत प्रेम आणि विश्वासाचे नाते तुटू देणार नाही."

Web Title: shivraj singh chouhan say i am here do not go anywhere will support new government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.