Narendra Modi: बूथ अभियानासाठी मोदींनी मध्य प्रदेशचीच निवड का केली? असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:07 IST2023-06-26T15:06:52+5:302023-06-26T15:07:17+5:30
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मोदी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Narendra Modi: बूथ अभियानासाठी मोदींनी मध्य प्रदेशचीच निवड का केली? असं आहे कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशचीच निवड का केली, याची काही खास कारणं आहेत.
मध्य प्रदेशमधील भाजपाच्या बूथ मॅनेजमेंटने आपल्या कार्याची अनेकदा चुणूक दाखवली आहे. हल्लीच व्ही.डी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बूथ विस्तार अभियानामध्ये ऐतिहासिक यश मिळवलं होतं. त्याचं कौतुक केंद्रीय नेतृत्वानेही केलं होतं. यादरम्यान, पन्ना प्रमुखांची नियुक्ती आणि बूथ विजय संकल्प यासारखे कार्यक्रमही हाती घेतले गेले, जे मध्य प्रदेशमध्ये आधी कधीही दिसले नव्हते.
मध्य प्रदेश भाजपाने गेल्या काही दिवसांपूर्वी बूथ विस्तारक अभियानांतर्गत ६४ हजार बूथवरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आणि नवी उर्जा निर्माण करण्याचं काम केलं. तसेच त्यांना पूर्णपणे डिजिटलाइज्ड करण्याचंही काम केलं. त्यामधून बूथवरील एक पदाधिकारी आणि अर्थ पन्ना प्रमुखाला एका अॅपच्या माध्यमातून जोडण्यात आले. त्यांची माहिती साठवण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयातील कुठलीही व्यक्ती त्या माहितीच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करू शकते.
आणखी एक कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम राज्यातील अधिकाधिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला पाहता यावा यासाठी मध्य प्रदेश भाजपाकडून व्यवस्था करण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता मन की बात कार्यक्रम ऐकते. या कारणांमुळेच मोदींनी बूथ अभियानासाठी मध्य प्रदेशची निवड केली आहे.
२७ जून रोजी मोदी भोपाळ दौऱ्यात एका खास कार्यक्रमामध्ये देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील ५-५ बूथवरील कार्यकर्त्यांशी व्हर्चुअली संवाद साधणार आहेत. तर भोपाळमध्ये थेट अडीच ते तीन हजार बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर एक रोड शो होईल. रोड शो संपल्यावर मोदी राणी कमलापती स्टेशनवरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.