Success Story: मोठ्या पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची वाट, आता कोटींमध्ये कमावतोय; शेतात असं काय पिकवलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:36 IST2026-03-27T19:33:55+5:302026-03-27T19:36:08+5:30
Profitable Agriculture Ideas: मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील राकेश यादव या तरुणाने सिद्ध करून दाखवलंय की, जर तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेती हा सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे.

Success Story: मोठ्या पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची वाट, आता कोटींमध्ये कमावतोय; शेतात असं काय पिकवलं?
शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, असे म्हणणाऱ्यांसाठी मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील एका तरुणाने नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. ४.५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी सोडून राकेश यादव या तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, पारंपारिक लाल टरबूजांऐवजी त्यांनी पिकवलेली पिवळ्या रंगाची टरबूज सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
राकेश यादव यांनी कृषी शाखेतून पदवी पूर्ण केली आहे. शिक्षणानंतर त्यांना साडेचार लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरीही चालून आली. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या शेतीत करण्याचा निर्णय घेतला. आगर मालवा जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या महुडिया गावातील आपल्या जमीनीत हाय-व्हॅल्यू फार्मिंगृचा प्रयोग यशस्वी केला.
महुडिया गाव सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. अनेक शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक घेतल्यानंतर आपली शेते पडीक सोडली आहेत. मात्र, अशा रखरखीत वातावरणात राकेश यांची शेती एखाद्या हिरव्यागार नंदनवनासारखी दिसते. फलोत्पादन विभागाच्या तांत्रिक सहाय्याने आणि अनुदानाचा लाभ घेत त्यांनी आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे.
शेतात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे
राकेश यांची शेती करण्याची पद्धत ही एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे स्मार्ट आहे. संपूर्ण शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून ते सौर ऊर्जेवर चालतात. हे सर्व कॅमेरे त्यांच्या स्मार्टफोनशी जोडलेले आहेत, ज्यामुळे ते कोठूनही आपल्या पिकावर लक्ष ठेवू शकतात. "शेतीमध्ये मानसिकता बदलणे आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही विज्ञानाची जोड दिली, तर शेती हा सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो," असा विश्वास राकेश यादव यांनी व्यक्त केला आहे.
पिवळ्या रंगाच्या टरबूजाची ग्राहकांना भुरळ
सामान्यतः आपण लाल रंगाची टरबूज पाहिली आहेत, पण राकेश यांनी त्यांच्या शेतात पिवळ्या रंगाची अनोखी टरबूज पिकवली आहेत. या कलिंगडांना बाजारपेठेत सामान्य कलिंगडांच्या तुलनेत जास्त मागणी आणि किंमत मिळत आहे. केवळ रंगानेच नाही तर चवीनेही ही टरबूज ग्राहकांना भुरळ घालत आहेत.