भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 03:56 PM2023-08-13T15:56:10+5:302023-08-13T16:11:24+5:30

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप ट्विटद्वारे केला होता.

indore fir against priyanka gandhi kamal nath in 50 percent commission dispute political storm | भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

इंदूर : मध्य प्रदेशात ५० टक्के कमिशनचा वाद वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी, राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्येष्ठ नेते अरुण यादव यांच्या ट्विटरवरील एका पोस्टविरोधात भाजप नेत्यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार, इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ४६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, पोलिसांनी ज्ञानेंद्र अवस्थी नावाच्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. 

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप ट्विटद्वारे केला होता. त्या म्हणाल्या की, "मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या संघटनेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली आहे की, त्यांना ५० टक्के कमिशन दिल्यानंतरच पैसे मिळतात. कर्नाटकातील भ्रष्ट भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेत होते. मध्य प्रदेशात भाजपाने भ्रष्टाचाराचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. कर्नाटकच्या जनतेने ४० टक्के कमिशन सरकारची हकालपट्टी केली, आता मध्य प्रदेशातील जनता ५० टक्के कमिशन सरकारला सत्तेवरून हटवेल," असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता.

या ट्विटवरून भाजपा कायदेशीर सेलचा कार्यकर्ता निमेश पाठक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शनिवारी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इंदूरमधील संयोगितागंज येथे भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) आणि ४६९ (प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, याप्रकरणी भाजपच्या इतर नेत्यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
निमेश पाठक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या वृत्तपत्राच्या एका वृत्ताबद्दल त्यांना माहिती मिळाली. एका खासदाराने काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून ५० टक्के कमिशन मागितल्याबाबत कंत्राटदार संघटनेने उच्च न्यायालयात पत्र लिहिले होते. हे पत्र ज्ञानेंद्र अवस्थी यांनी लिहिले होते. परंतु, त्यांनी अवस्थीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना अशा कोणत्याही संघटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही". 

याचबरोबर, "मध्य प्रदेश सरकार आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करणारे आरोप करून हे पत्र नियोजनबद्ध पद्धतीने विविध सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल केले जात असल्याचा संशय आहे . जर ते खरे असेल आणि ज्ञानेंद्र अवस्थी प्रत्यक्षात उपलब्ध असतील तर मध्य प्रदेश सरकारच्या धोरणानुसार आणि नियमांनुसार कठोर कारवाई केली जावी," असेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, डोक्यापासून पायापर्यंत घोटाळ्यांनी घेरलेल्या शिवराज सिंह चौहान सरकारच्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील भाजप नेत्यांनी प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढे कमलनाथ म्हणाले की, ज्या सरकारला मध्य प्रदेशमधील सर्वजण कमिशन राज सरकार म्हणतात, ते सरकार भ्रष्टाचाराची चौकशी करू शकत नाही. उलट भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना छळू शकते. मी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहण्याचे आणि हा ५० टक्के कमिशनचा नियम उखडून टाकण्याचे आवाहन करतो. 
 

Web Title: indore fir against priyanka gandhi kamal nath in 50 percent commission dispute political storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.