MP मध्ये भाजपाला बंपर यश, शिवराज सिंह यांना मुख्यमंत्री न बनवल्यास ही नावं CM पदाच्या शर्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 14:35 IST2023-12-03T14:34:20+5:302023-12-03T14:35:01+5:30
Madhya Pradesh Assembly Election Result: दणदणीत विजयानंतर भाजपाला शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवावे लागेल, अशी चिन्ह दिसत आहे. मात्र तरी पक्षाने मुख्यमंत्रिपदी नवा चेहरा देण्याचा विचार केल्यास खालील नावं आघाडीवर असतील.

MP मध्ये भाजपाला बंपर यश, शिवराज सिंह यांना मुख्यमंत्री न बनवल्यास ही नावं CM पदाच्या शर्यतीत
सर्व दावे, शक्याशक्यता, एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत मध्य प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र यावेळची निवडणूक आव्हानात्मक असल्याने भाजपाने मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. मात्र आता विजयानंतर या विजयाचं श्रेय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देण्यात येत आहे. पण आता १६० हून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांना पक्षाने पुन्हा मुख्यमंत्रिपदी संधी दिली नाही, तर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. आता दणदणीत विजयानंतर भाजपाला शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवावे लागेल, अशी चिन्ह दिसत आहे. मात्र तरी पक्षाने मुख्यमंत्रिपदी नवा चेहरा देण्याचा विचार केल्यास खालील नावं आघाडीवर असतील.
यामधील पहिलं नाव आहे, ज्योतिरादित्य शिंदे. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्याने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार पाडण्यात भाजपाला यश आलं होतं. या निवडणुकीतही ज्योतिरादित्य शिंदेंचं प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात भाजपाला चांगलं यश मिळालं आहे. आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे स्वत: शिवराजसिंह चौहान भेटायला गेले. त्यावरून त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी विचारात असल्याची चर्चा आहे.
भाजपामधील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमधील दुसरं नाव आहे ते म्हणजे कैलाश विजयवर्गीय. खासदार असलेल्या विजयवर्गीय यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यापासून ते ज्याप्रकारे विधानं करत आहेत. त्यावरून ते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक असल्याचे दिसत आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं नावही मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये घेतलं जात आहे. तोमर यांना मध्य प्रदेशमध्ये निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक बनवण्यात आल्यापासून त्यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे.
या यादीमधील पुढचं नाव आहे ते म्हणजे भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांना डार्क हॉर्स मानलं जातं आहे. ते विधानसभेची निवडणूक लढलेले नाहीत. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान, असे संकेत अनेकदा मिळाले ज्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे.
याशिवाय भाजपाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. ते शिवराज सिंह चौहान यांच्यानंतरचा राज्यातील ओबीसींचा चेहरा आहे. त्यामुळे शिवराज सिंह यांना पर्याय शोधायचा झाल्यास प्रल्हाद पटेल यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असेल. तसेच मध्य प्रदेधमधील विधानसभेच्या ४७ जागा आदिवासींसाठी राखीव आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनाही मुख्यमंत्रिपदासाठी प्राधान्य मिळू शकतं. त्याचा फायदा पक्षाला छत्तीसग आणि राजस्थानसारख्य राज्यांमध्येही होऊ शकतो.