‘माेदी की ग्यारंटी’वरच भाजपाची भिस्त; ४५० रुपयांत गॅस सिलिंडर, भाजपाचे संकल्पपत्र जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 09:33 IST2023-11-12T09:32:37+5:302023-11-12T09:33:10+5:30
मुलींना केजी ते पीजी माेफत शिक्षण

‘माेदी की ग्यारंटी’वरच भाजपाची भिस्त; ४५० रुपयांत गॅस सिलिंडर, भाजपाचे संकल्पपत्र जाहीर
- अभिलाष खांडेकर
भाेपाळ : ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, ‘लाडली बहना’ याेजनेत पक्के घर, धान खरेदी ३,१०० रुपये प्रतिक्विंटल, गहू खरेदी २,७०० रुपये प्रतिक्विंटल, गरीब कुटुंबातील मुलांना इयत्ता बारावीपर्यंत माेफत शिक्षण, ग्रामीण भागातील महिलांना लखपती बनविण्यासाठी विशेष याेजना इत्यादी आश्वासने भाजपने मध्य प्रदेशातील जनतेला दिली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे संकल्पपत्र जाहीर झाले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, ज्याेतिरादित्य सिंधिया यांच्यासह मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्या हस्ते संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. काँग्रेसने १७ ऑक्टाेबर राेजी जाहिरनामा प्रसिद्ध केला हाेता. त्यानंतर भाजपच्या जाहिरनाम्याकडे लक्ष लागले हाेते. घाेषणापत्र जाहीर करण्यापूर्वी भाजपने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यात ‘फिर से भाजप सरकार, एमपी की यही हुंकार’ असा नारा देण्यात आला आहे.
शेतकरी सन्मान निधी व शेतकरी कल्याण याेजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार.
३,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने धान व २,७०० रुपये प्रतिक्विंटल दराने गहू खरेदी.
पंतप्रधान आवास याेजनेसाेबत मुख्यमंत्री जनआवास याेजना सुरू करणार.
‘लाडली बहना’ना अर्थ साहाय्यातून पक्के घर मिळेल.
तेंदूपत्ता संकलन दर ४ हजार रुपये प्रतिपाेते करणार.
सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भाेजनासाेबत मिळेल पाैष्टिक नास्ता देणार.
आयआयटी आणि एम्सच्या धर्तीवर एमआयआयटी आणि मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स उभारणार.
उज्ज्वला आणि ‘लाडली बहना’ना ४५० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर.
गरीब कल्याण अन्न याेजनेत गहू, तांदूळ आणि डाळींसह माेहरीचे तेल आणि साखरही देणार.
आदिवासी कल्याणासाठी ३ लाख काेटी रुपये खर्च करणार.
विंध्य, नर्मदा, अटलप्रगती, मालवा निमाड, बुंदेलखंड व मध्य भारत विकास पथ, असे सहा एक्स्प्रेस-वे बनविणार.
गरीब कुटुंबातील मुलींना केजी ते पीजीपर्यंत माेफत शिक्षण.
एकलव्य विद्यालय आणि अनुसूचित जमातीबहुल जिल्ह्यांत मेडिकल काॅलेज.
लाडली लक्ष्मींना जन्मापासून वयाच्या २१ वर्षांपर्यंत एकूण २ लाख रुपये देणार.
१५ लाख ग्रामीण महिलांना काैशल्य प्रशिक्षणाद्वारे लखपती बनविणार.
हा मुद्दा गायब
प्रमुख आश्वासनांमध्ये गरीबांना ५ वर्षांसाठी माेफत धान्य, प्रत्येक कुटुंबात किमान एकाला नाेकरी किंवा स्वयंराेजगाराची संधी इत्यादी याेजनांचा समावेश आहे. मात्र, एमआयटी आणि एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय संस्थेव्यतिरिक्त विकासासंदर्भात एकही घाेषणा नाही. भाजप यावेळी पूर्णपणे नरेंद्र माेदींची प्रतिमा आणि त्यांच्या विश्वासार्हतेवरच अवलंबून आहे. जाहिरनाम्यातही ‘माेदी की गॅरंटी, भाजप का भराेसा’ असा नारा दिला आहे.