Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:55 IST2025-11-21T14:52:35+5:302025-11-21T14:55:11+5:30
Health Crisis News: भारतातील ८३ टक्के रुग्णांमध्ये मल्टिड्रग रेझिस्टन्स ऑरगॅनिझम म्हणजेच बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू आढळतात, असे रुग्ण सामान्य अँटिबायोटिक औषधांमुळे बरे होत नसल्याचे आढळून आले आहे.

Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
नवी दिल्ली : भारतातील ८३ टक्के रुग्णांमध्ये मल्टिड्रग रेझिस्टन्स ऑरगॅनिझम (एमडीआरओ) म्हणजेच बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू आढळतात. असे रुग्ण सामान्य अँटिबायोटिक औषधांमुळे बरे होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना तीव्र क्षमतेची औषधे द्यावी लागतात. ही स्थिती केवळ रुग्णांसाठीच नव्हे तर देशाच्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. ही बाब लॅन्सेट ई-क्लिनिकल मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात नमूद करण्यात आली आहे.
या लेखात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आपल्या देशात आरोग्याबाबतची बेफिकिरीदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते. डॉक्टरांच्या चिठ्ठीविना कोणालाही औषधे दुकानात सहजी उपलब्ध होतात, अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्या मनाने किंवा औषधविक्रेता सांगतो म्हणून एखादे औषध घेतात. छोट्या छोट्या कारणांसाठी रुग्णाला अँटिबायोटिक औषधे देणे या गोष्टींमुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शिवाय अँटिबायोटिक औषधांना प्रतिरोध करण्याची जीवाणूंची शक्ती वाढत आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
या सवयी वाढवत आहेत धोका
अँटिबायोटिक औषधांचा दुरुपयोग, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे सहज मिळणे, उपचार अपूर्ण ठेवणे, स्वतःच औषधांचा वापर करणे
निष्कर्ष असा...
भारतासह चार देशांतील १२००हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचे विश्लेषण करून मगच काही निष्कर्ष काढण्यात आले.
औषधांची विषाणूंना सवय
संशोधकांनी इशारा दिला की, कमी तीव्रतेच्या अँटिबायोटिक औषधांना जीवाणू दाद देईनासे झाले की तीव्र क्षमतेची औषधे दिली जातात. पण त्याचीही विषाणूंना सवय होत आहे. भारतात हीच स्थिती राहिली तर नागरिकांच्या आरोग्याला धोका होईल. अँटिमायक्रोबियल स्टिवर्डशिप' सप्ताहाच्या निमित्ताने लॅन्सेटमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला.