विद्युत डीपीवर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: May 13, 2024 05:14 IST2024-05-13T05:14:07+5:302024-05-13T05:14:40+5:30

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील घटना

youth who climbed on the electric dp dies due to electrocution | विद्युत डीपीवर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

विद्युत डीपीवर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

राजकुमार जाेंधळे, लातूर : विद्युत डीपीवर दुरुस्तीच्या कामासाठी चढलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने डीपीवरच मृत्यू झाल्याची घटना बाभळगाव (ता. लातूर) येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पाेलिसांनी रात्री उशिरा दिली़

पोलिसांनी सांगितले, बाभळगाव येथील विद्युत डीपीवर दुरुस्तीच्या कामासाठी गावातीलच ३२ वर्षीय तरुण चढला होता. यावेळी त्याला विजेचा जबर धक्का बसला अन् तो डीपीवर असतानाच मृत्यू पावला. घटनेची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. डीवायएसपी सुनील गोसावी, पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, बीट अंमलदार अनिल जगदाळे, पोहेकॉ. लक्ष्मण कुमरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. गुन्हा दाखल करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतल्याने राविवारी रात्री उशिरापर्यंत पेच निर्माण झाला होता. साेमवारी पेच सुटल्यनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

कर्मचाऱ्यावर कारवाई करा; संतप्त नातेवाईकांची मागणी...

बाभळगाव येथील डीपीवर दुरुस्तीच्या कामासाठी चढलेल्या तरुणाला नेमक्या कोण्या कर्मचाऱ्याने चढण्यासाठी सांगितले होते, याची माहिती पोलिस घेत आहेत. शिवाय, संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असे बीट अंमलदार अनिल जगदाळे म्हणाले.

Web Title: youth who climbed on the electric dp dies due to electrocution

टॅग्स :electricityवीज