उदगिरात बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू, एक जण जखमी
By संदीप शिंदे | Updated: June 6, 2023 16:40 IST2023-06-06T16:40:34+5:302023-06-06T16:40:58+5:30
शहर पोलीस स्टेशनसमोरील घटना

उदगिरात बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू, एक जण जखमी
उदगीर : येथील शहर पोलीस स्टेशनसमोरील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर सोमवारी रात्री ११:३० वाजेच्या दरम्यान, बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात एकजण जखमी झाला असून, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील मध्यभागातून जाणाऱ्या नांदेड-बिदर रोडवर सोमवारी रात्री शहर पोलीस स्टेशनसमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरील रोडवरून शैलेश संजय पाटील (वय २८ रा. कपाळेनगर, उदगीर) यास नांदेडहुन-उदगीरकडे येणाऱ्या बस क्रमांक एमएच २४ ए.व्ही. ८०६० च्या चालकाने बस निष्काळजीपणे चालवून जोराची धडक दिली.
यात शैलेश पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर रितेश राजकुमार कोटलवार हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रितेश कोटलवार यांच्या तक्रारीवरून बस चालक दिपक भिमराव गोरखे यांच्याविरुद्ध मंगळवारी पहाटे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.