भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; १५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: May 4, 2025 00:18 IST2025-05-04T00:18:13+5:302025-05-04T00:18:59+5:30
नळेगाव-आष्टामाेड मार्गावर रात्री ७:१५ वाजताचा अपघात

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; १५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
राजकुमार जाेंधळे / नळेगाव (जि. लातूर): भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जाेराच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला तर १५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना नळेगाव ते आष्टामाेड मार्गावर येलमवाडीनजीक शनिवारी रात्री सव्वासात वाजता घडली. घटनास्थळावरुन अज्ञात वाहनचालकाने धूम ठाेकली. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील नळेगाव ते आष्टा माेड मार्गावर असलेल्या येलमवाडीनजीक लातूर येथून लक्कडजवळगा गावाकडे जात असलेल्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जाेराने उडवल्याची घटना शनिवार, ३ मे रोजी सायंकाळी ७:१५ वाजताच्या सुमारास घडली. लातूरकडे निघालेल्या भरधाव अज्ञात वाहनाने तरुणाच्या दुचाकीला जाेराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण हाेता. की, यामध्ये दुचाकीवरील महेश लिंबराज माडे (वय २५, रा. लक्कडजवळगा ता. शिरूर अनंतपाळ) हा तरुण जागीच ठार झाला. तर साेबत असलेला ओंकार विजय कांबळे (वय १५) हा गंभीर जखमी झाला आहे.
जखमी मुलाला नळेगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती चाकूर येथील पाेलिसांना देण्यात आली असून, पाेलिसांकडून अज्ञात वाहनाचा शाेध घेतला जात आहे. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती.