कळंब पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:30 IST2025-07-08T11:22:53+5:302025-07-08T11:30:02+5:30
मुरूड ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच इन कॅमेरा शवविच्छेदनाची तात्पुरती सोय करून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले.

कळंब पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन
मुरूड : कळंब (जि. धाराशिव) पोलिसांच्या मारहाणीत तालुक्यातील ढोराळा येथील भैरू येडबा चौधरी (वय ४०) या युवकाचा मृत्यू झाला असून, पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाइकांनी मुरूड येथील बसस्थानकासमोर सोमवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, मयत तरुणाचे येथील ग्रामीण रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
भैरू चौधरी या युवकास शनिवारी कळंब पोलिस कौटुंबिक वादाचे कारण देत ठाण्यात घेऊन गेले. त्याठिकाणी पोलिसांनी त्यास मारहाण करून सोडून दिले. रविवारी सकाळी तो घरी आल्यावर त्याला त्रास वाढत असल्याने मुरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. घरी गेल्यावर काही वेळातच त्याची प्रकृती खराब झाल्याने रविवारी संध्याकाळी ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
यावेळी गावातील तरुणांनी याप्रकरणी कळंब पोलिसांवर अगोदर गुन्हा दाखल करा, मगच शवविच्छेदन करा, अशी भूमिका घेतली. काहीजण शिराढोण (ता. कळंब) पोलिस ठाण्यात गेले. मात्र, त्याठिकाणी गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आला. सोमवारी सर्व नातेवाईक धाराशिवच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. तोपर्यंत मुरूड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून बारा तासांपेक्षा अधिक कालावधी झाला होता. पोलिस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत नातेवाईक व ढोराळा गावचे नागरिक मुरूड बसस्थानकासमोर ठिय्या मारून बसले. यामुळे जवळपास एक ते दीड तास रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे यांनी मुरूड येथे नातेवाइकांशी चर्चा केली, त्यानंतर रस्ता रिकामा करण्यात आला.
मुरूडमध्ये पहिल्यांदाच इन कॅमेरा शवविच्छेदन
मुरूड ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच इन कॅमेरा शवविच्छेदनाची तात्पुरती सोय करून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि धरणीधर कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर पवार, मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, ढोकी पोलिस ठाण्याचे सपोनि विलास हजारे हे उपस्थित होते. यावेळी रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला होता.