मंगळसूत्र, गंठण चाेरणाऱ्या महिला अडकल्या जाळ्यात, स्थागुशाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: February 2, 2025 20:38 IST2025-02-02T20:38:48+5:302025-02-02T20:38:57+5:30
चार गुन्ह्यांचा झाला उलगडा...

मंगळसूत्र, गंठण चाेरणाऱ्या महिला अडकल्या जाळ्यात, स्थागुशाची कारवाई
राजकुमार जाेंधळे / लातूर : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या दाेघा महिलांना लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीमध्ये विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चाेरी, इतर गुन्ह्यांतील आराेपींच्या अटकेचे आदेश पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले. आदेशानुसार अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आराेपींचा माग काढला. विविध पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली. जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचा अभ्यास केला. दरम्यान, पाेलिसांना खबऱ्याने माहिती दिली. चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी दाेन महिला लातुरातील रेणापूर नाका ते गरुड चाैक मार्गावर आहेत. या आधारे पाेलिसांनी घटनास्थळी धडक देत, दाेन महिलांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चाैकशी केली असता, त्यांनी स्वाती उमाकांत तपसाळे (वय ३२) आणि महादेवी सर्जेराव देडे (वय ३४, दाेघेही रा. जयनगर, लातूर) अशी नावे सांगितली. पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेत चाैकशी केली असता, लातूरसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत, बसमध्ये चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
याबाबत औसा पाेलिस ठाण्यात मंगळसूत्र चोरीचे २ गुन्हे दाखल असून, गांधी चौक, निलंगा ठाण्यात प्रत्येकी एक असे चार गुन्ह्यांची नाेंद आहे. त्यांच्याकडून मंगळसूत्रे, गंठण असा १ लाख ३३ हजार १९४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थागुशाचे पो.नि. संजीवन मिरकले, पोउपनि. संजय भोसले, योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, महिला पोलिस अमलदार हिंगे, चालक चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.