लातूर : राज्यात १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी येथे केले.
लातूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा स्काऊट गाईडच्या सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अप्पाराव शिंदे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, तानाजी पाटील, आरडले, राज्य शिक्षक संघाचे शहराध्यक्ष राहुल देशमुख, प्राचार्य उमेश पाटील, मुख्याध्यापक संभाजी नवघरे आदी उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश देशमुख यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्याची मागणी केली. यावेळी आमदार विक्रम काळे म्हणाले, आगामी काळात १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील. दिवाळीपूर्वी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनासमोर आपली बाजू मांडू, असे आश्वासनही त्यांनी दिले. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक संभाजी नवघरे यांनी केले. या मेळाव्याला जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.