भिज पावसाने खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:46+5:302021-08-24T04:24:46+5:30

शिरुर अनंतपाळ: आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील प्रमुख जलसाठे ...

Wet rains save kharif crops | भिज पावसाने खरीप पिकांना जीवदान

भिज पावसाने खरीप पिकांना जीवदान

शिरुर अनंतपाळ: आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील प्रमुख जलसाठे तहानलेलेच असून, जलस्त्रोतांमध्ये मर्यादित पाणीसाठा असल्याने जलसाठे पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असून, निम्मा पावसाळा संपला तरीही मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी अत्यल्प असल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त केली जात आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडीसारखे मध्यम प्रकल्प तर डोंगरगाव येथे बॅरेज आणि हालकी येथे कोल्हापुरी बंधारा असे जलस्त्रोत असल्याने शिरुर अनंतपाळ प्रकल्पाचा तालुका म्हणून सर्वत्र ओळखला जातो, परंतु यंदा पावसाळा वेळेवर झाला असला तरी, दोन महिने उलटले तरीही सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ शकली नाही.परिणामी या प्रकल्पावरून कार्यान्वित करण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. शिवाय धरणसाठ्यातील पाण्यावर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायती शेती अवलंबून असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी धरणातील साठ्याची पाणीपातळी अत्यल्प आहे. उपयुक्त पाणीसाठा २५ टक्क्यांच्या आतच आहे.त्यामुळे धरणसाठे ओव्हर फ्लो होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकरी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, धोंडिराम कारभारी, विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.

ऊसासाठी जलस्त्रोत भरणे आवश्यक...

तालुक्यात यंदा ३५०० हजार हेक्टर्सवर नवीन उसाची लागवड झाली आहे. घरणी, साकोळ, पांढरवाडी सारखे मध्यम प्रकल्प भरले तर किमान दोन वर्षे उसाची जोपासना होईल या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे, परंतु निम्मा पावसाळा संपला तरीही जलस्त्रोतांमध्ये मर्यादित पाणीसाठा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले असून जलस्त्रोत भरणे आवश्यक असल्याचे सांगत आहेत.

सरासरीच्या ५० टक्के पाऊस..

शिरुर अनंतपाळ तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान ७५० मिलीमीटर आहे, परंतु यंदा निम्मा पावसाळा संपला तरीही आजतागायत केवळ ३८३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून सुरू असलेल्या भिज पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी जलसाठे मात्र तहानलेलेच आहेत.

Web Title: Wet rains save kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.