पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती
By संदीप शिंदे | Updated: July 14, 2023 19:38 IST2023-07-14T19:37:50+5:302023-07-14T19:38:23+5:30
औशात पाण्याची स्थिती बिकट; काळे ढग आणि वारे असल्याने शेतकरी हवालदिल

पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती
औसा : जून महिना संपला, जुलैचा मध्यावधी आला तरीदेखील औसा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या ४५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहे. ज्यांनी पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना पिके कशी वाचवावी याची चिंता आहे. दररोज आकाशात काळे ढग आणि सुसाट वाऱ्याने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडल्याने फडातल्या उसाचे पाचट झाले असून, त्याची वैरण करून जनावरांना टाकण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील स्थिती बिकट झाली आहे.
औसा तालुका मागासलेला तालुका असून दरवर्षी पर्जन्यमान कमीच होते. यासह या भागात धरण, मोठे तलाव, उपसा सिंचनामुळे ओलिताखाली क्षेत्र वाढेल, असा पर्यायच नसल्याने सततच दुष्काळांशी झुंज द्यावी लागते. पाऊस चांगला झाला तरच शेती अन्यथा सर्वत्र वाळवंट असते. यंदा तर स्थिती बिकट असून पावसाळा सुरू होऊन ४० दिवस झाले, दोन नक्षत्र कोरडीच गेली आहेत. आतापर्यंत तालुक्यात ७० मि.मी. पाऊस झाला. तो गतवर्षीच्या तुलनेत निम्माच असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांचे वार्षिक अंदाज चुकताना दिसत आहे. एकरी १० हजारांचा खर्च करून कमी पावसावरच ५५ टक्के म्हणजेच ६१ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. पण, त्यातही बहुतांश ठिकाणी बियाणे उगवण झाली नाही. यंदा सर्वाधिक ९० टक्के पेरा सोयाबीनचा असून मूग व उडिदाच्या पेऱ्यात कमालीची घट झाली. जुलैचा मध्यावधी उजाडला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. बहुतांश जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
भुईमुगासह तीळ, सूर्यफूल नामशेष?
तालुक्यात सध्या झालेल्या पेऱ्यामध्ये गळीत धान्यात समावेश असणाऱ्या भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि कारळे यांचा पेरा शून्य आहे. उर्वरित पेरणीत या पिकांचा समावेश होईल याची शाश्वती वाटत नसल्याने हे वाण नामशेष होतील? अशी भीती आहे. हे वाण स्वयंपाक घरातील महत्त्वाचे असून देखील १ लाख हेक्टर होणाऱ्या पेऱ्यात यांचा टक्का शून्य असल्याने ही चिंतेची बाब आहे.
तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या...
२०१६ ते १८-१९ या वर्षांत अनुक्रमे ३५, ३३, ३१ शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी आणि सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. हा आकडा मराठवाड्यात सर्वाधिक होता. २०१५ पासून यात चढ-उतार आहेत. यात २०१५ मध्ये २७, २०१६-३५, २०१७-२३, २०१८-३१, २०१९-३३, २०२०-२४, २०२१-२१, २०२२-१२ आणि चालू वर्षात आतापर्यंत ०५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.