इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे पडले महागात; महिलेने ओळख वाढवून तरुणाला १० लाखांस फसवले
By राजकुमार जोंधळे | Updated: June 24, 2023 20:04 IST2023-06-24T20:03:27+5:302023-06-24T20:04:15+5:30
प्रारंभी लाखाची गुंतवणूक करायला सांगितले. त्यावेळी दर आठवड्याला चांगले व्याज दिले

इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे पडले महागात; महिलेने ओळख वाढवून तरुणाला १० लाखांस फसवले
लातूर : इन्स्टाग्रामवर रिल्स, मराठी मालिकेला फाॅलाे करणे लातुरातील एका तरुणाला महागात पडले आहे. कल्याण (जि. ठाणे) येथील एका महिलेकडून अधिकच्या व्याजाचे आमिष दाखवत चक्क दहा लाखांनी गंडा घातल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात शनिवारी महिलेविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, इन्स्टाग्रामवर रिल्स, मराठी मालिकेला फाॅलाे, लाइक करत असताना तक्रारदार पंकज विनायक जाधव (वय २१, रा. शिंदखेड, ता. निलंगा, ह.मु. शारदानगर, लातूर) याची मुंबईच्या एका महिलेसाेबत ओळख झाली. इन्स्टाग्रामवर मराठी मालिका, रिल्स पाहिली. त्यातील एका बालकलाकाराचे त्याने काैतुक केले. फाॅलाे केले. यातून त्या कलाकाराच्या आईची ओळख झाली. पूजा निशांत भाेईर (रा. कल्याण, जि. ठाणे) असे महिलेचे नाव आहे. याच ओळखीतून तरुणाला आकर्षक व्याज देण्याचे तिने आमिष दाखविले. त्यासाठी एक स्कीमही सांगितली. कुठले तरी ॲप्लिकेशन डाउनलाेड करायला सांगितले. १५ जानेवारी ते १० जून २०२२ या काळात त्या महिलेने जाधवकडून तब्बल दहा लाख रुपये घेतले. गत काही दिवसांपासून त्या महिलेने व्याज दिले नाही. अधिक चाैकशी केली असता मुद्दलही दिले नाही. दरम्यान, काही दिवसांनंतर त्या महिलेने पैसे परत करण्यासाठी मुदत मागितली. त्या मुदतीतही पैसे परत केले नाहीत.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पूजा निशांत भाेईर (रा. कल्याण, जि. ठाणे) या महिलेविराेधात गुरनं. ४५२/ २०२३ कलम ४०६, ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक आर. ए. लाेखंडे करत आहेत.
१३ आठवडे मिळाले व्याज...
प्रारंभी लाखाची गुंतवणूक करायला सांगितले. त्या लाखावर दर आठवड्याला ७ हजार ७० रुपयांचे व्याज दिले गेले. दरम्यान, सलग १३ आठवड्यांनंतर एक लाख रुपये काढून घेण्यास सांगितले. मात्र, तरुणाने रक्कम काढून घेण्यास नकार दिला. त्यानंतर आता किमान दहा लाख रुपये ठेवावे लागतील, अशी अट घातली गेली. त्यानुसार तरुणाने दहा लाखांची जाेड करून गुंतवणूक केली. काही दिवसांनंतर व्याजही बंद झाले. अधिक चाैकशी केली असता फसवणूक झाल्याचे समाेर आले.
- गाेरख दिवे, पाेलिस निरीक्षक, लातूर