कोविड केअर सेंटरमधील ४०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:33+5:302020-12-30T04:26:33+5:30
जुलै महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. या कालावधीत जिल्ह्यात २० शासकीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. ...

कोविड केअर सेंटरमधील ४०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रतीक्षा
जुलै महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. या कालावधीत जिल्ह्यात २० शासकीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यासाठी चारशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी नियुक्ती केली होती. यामध्ये काही जणांची तीन महिने तर काहींची अकरा महिन्यांसाठी नियुक्ती आहे. हा कालावधी संपत आला असल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी करण्याची मागणी होत आहे.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी
कोरोना काळात नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये डाॅक्टर्स, स्टाफनर्स, लॅब टेक्निशियन, वाॅर्ड बाॅय, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २० शासकीय कोविड केअर सेंटर होते. सध्या आठहून अधिक कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कंत्राटींची नियुक्ती केली होती.
सेवेतून कमी केल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न
कोरोना काळात रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक जणांनी आरोग्य सेवा बजावली. ११, ६ आणि ३ महिन्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या. आता कार्यकाळ संपल्याने बेरोजगारीचे संकट उभे राहणार आहे. परिणामी, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. सध्या मोजकेच कोविड केअर सेंटर सुरू असल्याने केवळ १५० जणांच्या हाताला काम आहे. तर २५० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला. संकटकाळात रुग्णसेवा बजावली. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे. स्टाफनर्स, डाॅक्टर, वाॅर्ड बाॅय यांना न्याय द्यावा, हीच मागणी आहे.
- राजकुमार कांबळे,
कंत्राटी कर्मचारी
सरकारच्या हाकेला साथ देत कर्तव्य बजावले. त्यामुळे सेवेत कायम करावे. ५० टक्के आरक्षण द्यावे, आरोग्य विभागात जागा राखीव ठेवाव्यात. भरती नाही तोपर्यंत शिक्षणाच्या आधारावर एनआरएचएममध्ये समायोजन करून घ्यावे, कायमस्वरूपी रोजगार द्यावा.
- डाॅ. लक्ष्मण मोहाळे,
कंत्राटी कर्मचारी.