Waiting for good environment for artificial rainfall | कृत्रिम पावसासाठी प्रतीक्षा पोषक वातावरणाची 

कृत्रिम पावसासाठी प्रतीक्षा पोषक वातावरणाची 

ठळक मुद्देऔरंगाबाद, सोलापूर, नागपूर या तिन्ही ठिकाणी रडार यंत्रणा तयारकृषिमंत्री अनिल बोंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लातूर : कृत्रिम पावसासाठी औरंगाबाद, सोलापूर, नागपूर या तिन्ही ठिकाणी रडार यंत्रणा तयार आहे़ विमाने आली आहेत़ मात्र, योग्य वातावरण निर्मिती होत नसल्याने भारतीय हवामान विभागाने हिरवा कंदील दाखविलेला नाही़ त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग अद्याप राबविण्यात आला नसल्याची माहिती कृषिमंत्री डॉ़ अनिल बोंडे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ 

लातूर जिल्ह्यातील पाऊस, पीक स्थितीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री डॉ़ बोंडे दौऱ्यावर आहेत़ मंगळवारी त्यांनी जिल्ह्यातील नळेगाव, आष्टामोड, शिरूर ताजबंद या ठिकाणी शिवार पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला़ यानंतर  पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे़ त्यामुळे या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे़ त्या अनुषंगाने यंत्रणा तयार आहे़ मात्र, पोषक वातावरण नसल्याने हवामान विभागाकडून हिरवा कंदिल मिळत नाही़ शिवाय, गतवर्षी राज्यात ९१ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता़ त्या तुलनेत ४९ लाख शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे़ यावर्षीही १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे़ पत्रपरिषदेला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ. त्र्यंबक भिसे, आ़ सुधाकर भालेराव, जि़प़ अध्यक्ष मिलिंद लातुरे, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे आदी उपस्थित होते़ 

पीकविम्यासाठी तालुकास्तरावर समिती
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत़ त्यामुळे तालुकास्तरावर दक्षता समिती नेमली आहे़ यात दोन शेतकरी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे़ या समितीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होण्यामध्ये मदत होणार आहे़

Web Title: Waiting for good environment for artificial rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.