जुलमी राजवटीविरुद्ध उत्कावासीयांचा लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:39+5:302021-09-17T04:24:39+5:30

उत्का : हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानींची प्रकर्षाने आठवण होते. त्याचवेळी जुलमी राजवटीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील ...

Utkavasis fight against tyrannical regime! | जुलमी राजवटीविरुद्ध उत्कावासीयांचा लढा !

जुलमी राजवटीविरुद्ध उत्कावासीयांचा लढा !

उत्का : हैद्राबाद मुक्तीसंग्रामदिनी सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानींची प्रकर्षाने आठवण होते. त्याचवेळी जुलमी राजवटीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील अनेक गावांनी दिलेला लढा समोर राहतो. त्यात औसा तालुक्यातील उत्कावासीय मागे नव्हते.

१९४५ ते १९४८ या कालखंडात निजाम राजवटीने अन्याय, अत्याचाराची परिसीमा गाठली होती. लूट, हत्या आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांनी उन्माद माजविला होता. उत्का गावावरही दहशत होती. त्यावेळी लामजना येथे रझाकारांची कचेरी होती. तेथूनच परिसरातील नागरिकांंकडून दमदाटी करुन शेतसारा वसूल केला जात असे. त्या काळातील आठवणींना ८८ वर्षीय विश्वंभर अण्णाराव मुळे यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, जेव्हा इच्छा होईल तेव्हा जुलमी राजवटीतील पोलीस गावात येऊन धुडगूस घालत. उत्का गाव मातीच्या बुरुजावर वसलेले होते. या बुरुजाच्या मधोमध संभाजी मुळे यांचा मोठा वाडा होता. संभाजी भाऊराव मुळे यांचे आजोबा सुभानराव मुळे यांच्या वडिलांच्या काळात तो बांधला असावा. दोन मजली वाडा ज्यावर दोनशे लोक एकत्र येऊ शकतील, असा भव्य होता. जणू गावाचा तो सुरक्षा कवच होता. वाड्यावर तोफ बसविण्यात आली होती. पुढे, जीर्ण झालेला हा वाडा १९८० च्या सुमारास मोडकळीस येऊन लोप पावला. ज्या-ज्या वेळी जुलमी पोलीस दाखल हाेत तेव्हा गावकरी वाड्याच्या आश्रयाला येत होते. अण्णाराव भाऊराव मुळे, नागोराव शिंदे, निळाेबा वरेकर, रामराव पाटील, संभाजी मुळे, केशव मुळे, केशव पाटील, बाबुराव पाटील, किशनराव पाटील यांनी गावपातळीवर जुलमी राजवटीविरुद्ध एल्गार पुकारला होता. एका प्रसंगात गावातील भव्य वाड्यावरून तरुणांनी गोफण गुंड्यांचा मारा करून रझाकारांना पळवून लावले हाेते. त्याचा बदला घेण्यासाठी निजाम राजवटीतील २०० सैनिक गावात आले होते. त्यावेळी सुटका होणे अवघड होते मात्र, अण्णाराव मुळे यांनी मैत्रीचे संबंध असलेल्या मुबारक यांच्याशी संवाद साधला. अण्णाराव मुळे व रामराव पाटील हे रातोरात घोड्यावरून औसा येथे गेले. तेथून मुबारक यांच्याकडून मदत घेतली आणि रझाकारांच्या परतीचे आदेश मिळविले. अशा अनेक उर्जा देणाऱ्या शूर कथा जिल्ह्यातील गावोगावी अनेकांनी रचल्या. त्या सर्व थोरांचे स्मरण आजच्या दिवशी होते, असे विश्वंभर मुळे सांगत होते.

Web Title: Utkavasis fight against tyrannical regime!