घरफोड्या करण्यासाठी कारचा वापर! लातूर पोलिसांकडून धाराशिवच्या टोळीतील एकाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:30 IST2025-08-19T11:29:47+5:302025-08-19T11:30:24+5:30
पोलिसांच्या ताब्यातील सराईत गुन्हेगारांकडून अनेक गुन्ह्यांची कबुली

घरफोड्या करण्यासाठी कारचा वापर! लातूर पोलिसांकडून धाराशिवच्या टोळीतील एकाला बेड्या
लातूर : कारमधून प्रवास करत रात्रीच्या काळाेखात घरे फाेडून सोनेचांदीचे दागिने पळविणाऱ्या सराईत टाेळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातुरातील औसा राेड परिसरातून अटक केली. सोन्याचे दागिने, घरफाेडीच्या पैशातून खरेदी केलेली कार आणि दुचाकीही जप्त केली आहे. साथीदारसह भादा, निलंगा, कासार शिरशी हद्दीत घरफाेड्या केल्याची कबुली दिली आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफाेडीच्या घटना घडल्या असून, त्याबाबत संबंधित ठाण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आराेपींना अटक करण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले हाेते. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर यांच्या पथकाने चाेरट्यांचा शाेध सुरु केला. रात्री घरफाेड्या करणाऱ्या आरोपींची माहिती खबऱ्याने पाेलिस पथकाला दिली. माहितीची पडताळणी करुन लातुरातील छत्रपती चौक, औसा रोड परिसरातून एका सराईत चाेरट्याला दुचाकी, कारसह ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, त्याने अविनाश दिलीप भोसले (वय २४ रा. पाटोदा, जि. धाराशिव) असे नाव सांगितले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि. सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, प्रज्वल कलमे, श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने केली.
धाराशिव जिल्ह्यातील सराईत आराेपीला लातूरमधून उचलले...
लातुरात अटक केलेला आराेपी धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असून, ताे सराईत आहे. त्याच्याविराेधात विविध पाेलिस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. चाैकशीत आणखी गुन्हे उघड हाेण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.