जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST2021-03-23T04:20:38+5:302021-03-23T04:20:38+5:30
गत पावसाळ्यात अति पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. मात्र, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला. ...

जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली
गत पावसाळ्यात अति पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. मात्र, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला. विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे रबी हंगामाचा पेरा वाढला. तसेच नगदी पीक म्हणून शेतक-यांनी ऊसाची लागवड केली आहे. जिल्ह्यात अद्यापही पाणीटंचाई जाणवत नसली तरी वाढत्या उन्हांमुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. परिणामी, लघु तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यात लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प जोत्याखाली असून सध्या एकूण ६.९३८ दलघमी पाणीसाठा आहे. तसेच रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पही जोत्याखाली आहे. तिथे ०.७१६ दलघमी पाणी आहे. रेणापूर प्रकल्पात ०.२४५१ दलघमी, उदगीर तालुक्यातील तिरु प्रकल्पामध्ये ३.५२०, देवर्जनमध्ये ६.४९५, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्रकल्पात ५.५२१, घरणीमध्ये १२.०७४ तर निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात प्रत्यक्षात ७.४४३ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठा...
गेल्या वर्षी याच कालावधीत ५२.३६५ दलघमी एकूण पाणीसाठा होता. यंदा ६१.४८९ दलघमी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ९ दलघमीपेक्षा अधिक जलसाठा जास्त आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी या कालावधीत जिल्ह्यातील काही गावांत पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली होती. यंदा अद्यापही अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झाले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
देवर्जन प्रकल्पात सर्वाधिक पाणी...
तावरजा व व्हटी मध्यम प्रकल्प जोत्याखाली असल्याने तेथील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्य आहे. रेणापूर प्रकल्पात ११.९२, तिरु- २३.०२, देवर्जन- ६०.८१, साकोळ- ५०.४२, घरणी- ५३.७४ तर मसलगा प्रकल्पात ५४.७३ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १३२ लघु प्रकल्प असून तिथे ३४.२८ टक्के जलसाठा आहे.