कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले; विवाह समारंभासाठी जाताना अपघात
By हरी मोकाशे | Updated: April 30, 2023 17:24 IST2023-04-30T17:24:01+5:302023-04-30T17:24:20+5:30
विवाह समारंभासाठी मोटारसायकलवरुन तिघे निघाले असता अपघात झाला.

कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले; विवाह समारंभासाठी जाताना अपघात
लातूर: विवाह समारंभासाठी मोटारसायकलवरुन तिघे निघाले होते. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अचानकपणे धक्का लागून दुचाकीचा अपघात झाला. त्यात कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडल्याने दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील निवाडा फाट्याजवळ रविवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली.
रबानी अजिम शेख (३५, रा. चांडेश्वर, ता. लातूर) व अजय संजय जाधव (रा. बेंबळी टाकळी, ता. धाराशिव) असे मयत दोघांची नावे आहेत. रेणापूर पोलिसांनी सांगितले, अंबाजाेगाई तालुक्यातील सायगाव येथे विवाह समारंभासाठी रबानी अजिम शेख, अजय संजय जाधव आणि जयराज प्रताप काळे पाटील (३५, रा. चांडेश्वर) हे तिघे रविवारी दुपारी दुचाकी (एमएच २५, एव्ही १०३६) वरुन लातूर- अंबाजोगाई महामार्गावरुन जात होते. ते रेणापूर तालुक्यातील निवाडा फाट्यानजिक पोहोचले असता कंटेनर (एनएल ०२, एए ०२०४) जात होता. तेव्हा या मोटारसायकलस्वारांनी त्यास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरु केला.
दरम्यान, अचानकपणे दुचाकीचा धक्का कंटेनरला लागला आणि दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. त्यामुळे ते खाली पडले. तेव्हा कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन रबानी अजिम शेख व अजय संजय जाधव हे जागीच मृत्यूमुखी पडले. या अपघातात जयराज काळे पाटील हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रेणापूर पोलिसांत सुरु होती.