उदगिरात दोन घरे फोडली; १४ लाखांचा ऐवज लंपास
By हरी मोकाशे | Updated: June 16, 2024 17:31 IST2024-06-16T17:30:20+5:302024-06-16T17:31:51+5:30
याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगिरात दोन घरे फोडली; १४ लाखांचा ऐवज लंपास
उदगीर (जि. लातूर) : शहरातील निडेबन मार्गावरील तुलसीधाम सोसायटीतील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण १३ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शहरातील निडेबन रोडवर तुलसीधाम सोसायटी आहे. शनिवारी पहाटे २ः४५ वाजण्याच्या सुमारास या सोसायटीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. सोसायटीतील सेवानिवृत्त शिक्षक सोमेश्वर राचप्पा द्याडे हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी बाहेरगावी गेले होते, तसेच सोसायटीतील गोपाळ बाबूराव मनदुुमले हे सुद्धा घराला कुलूप लावून परगावी गेले होते. चोरट्यांनी सोसायटीत बंद असलेल्या दोन्ही घरांचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातील ९ लाख ८० हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख ९५, हजार असा एकूण १३ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून गेला. सदरील चोरटे प्रवेश करतानाच्या घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. चोरट्यांनी चेहऱ्यास कपडा बांधल्याचे निदर्शनास येत आहे. ही घटना घडल्यानंतर शेजारील नागरिकांनी फिर्यादीस कळविल्यानंतर सोमेश्वर द्याडे यांनी उदगिरात येऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.