औसा नगरपालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:26+5:302021-06-23T04:14:26+5:30
याप्रकरणी नगरविकास मंत्र्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, औसा पालिकेचे सदस्य सुनील उटगे व उन्मेष वागदरे यांनी १४ ...

औसा नगरपालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक अपात्र
याप्रकरणी नगरविकास मंत्र्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, औसा पालिकेचे सदस्य सुनील उटगे व उन्मेष वागदरे यांनी १४ जून २०१८ रोजी पालिकेच्या कार्यालयात गोंधळ घालून पालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे पालिकेच्या नागरिकांच्या आवश्यक कामात अडथळा निर्माण झाला. त्याचप्रमाणे या दोघांनी ६ जुलै २०१८ रोजी तहसील कार्यालयाजवळच्या जलकुंभावर चढून त्यांच्यासमवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. त्यामुळे पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊन चार तास पाणीपुरवठ्यात खंड पडला. याप्रकरणी नगराध्यक्षांनी दोघांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी खुलासाही सादर केला. या खुलाशाला सभेमध्ये वाचन करून त्याला अमान्य करून त्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पुणे यांनी सादर केलेला अहवाल शासनाला देण्यात आला. या सर्व बाबींवर लातूर जिल्हाधिकारी यांनी २८ फेब्रुवारी २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करण्यास सांगितले. मात्र, सुनावणीच्या वेळी संधी दिली असतानाही त्यांनी खुलासा सादर केला नाही. त्यामुळे दोघांनीही बचावाची संधी गमावली. याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यानुसार विहित कालावधीत निर्णय घेण्याचे आदेश असल्याने १७ जून रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील उटगे व उन्मेष वागदरे यांना अपात्र करीत आदेशाच्या तारखेपासून पाच वर्ष पालिका सदस्य व इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र ठरविले आहे.