तरुणाच्या खून प्रकरणातील दोघांना उदगीर, हैदराबादमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:42 PM2019-12-16T18:42:00+5:302019-12-16T18:43:33+5:30

अडीच महिन्यानंतर खुनाचा उलगडा

Two arrested in Udgir, Hyderabad | तरुणाच्या खून प्रकरणातील दोघांना उदगीर, हैदराबादमधून अटक

तरुणाच्या खून प्रकरणातील दोघांना उदगीर, हैदराबादमधून अटक

Next

लातूर : उपचारासाठी मुरुड येथून लातुरात आलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. दरम्यान, या खुनाच्या घटनेला अडीच महिन्यानंतर वाचा फुटली आहे. यातील तीन आरोपींपैकी दोघांना उदगीर आणि हैदराबाद येथून शिवाजीनगर पोलिसांनीअटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, देवळा (ता. कळंब) येथील मुळचा रहिवासी असलेल्या पण मुरुड येथे स्थायिक झालेल्या भारत सुधीर महाजन हा तरुण २३ सप्टेंबर २०१९ रोजी उपचारासाठी लातुरात आला होता. उपचारानंतर तो गावाकडे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आला. यावेळी तिघा अनोळखी व्यक्तींनी त्याला बोलण्यात गुंतविले. त्याची दिशाभूल करून शहरातील गोरक्षणकडे नेले. या ठिकाणी मोकळ्या जागेत तिघांनी रुमालाने तोंड दाबून आणि अन्य कपड्याने हात-पाय बांधून त्याच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल, आधार कार्ड आणि अंगठी लंपास केली. दरम्यान, गोरक्षण परिसरात कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटली. घटनेपूर्वी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल होती. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६७/२०१९ कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी तपास सुरू केला. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उदगीर येथून जावेद महेबुबसाब शेख याला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता अन्य दोन मित्रांचा सुगावा लागला. हैदराबाद येथून जावेद कुरेशी यालाही अटक करण्यात आली. दोघांकडून मोबाईल, आधार कार्ड, अंगठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिसरा आरोपी फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी दिली.पथकात सपोनि. पवार, पोउपनि. पठारे, पोलीस कर्मचारी शेख, भीमराव बेल्लाळे, माने, चामे, सोनटक्के, शिंदे, मुळे, कोंडरे, पाचपुते, कांबळे आणि चालक सावंत यांचा समावेश होता.

तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक करू...
सप्टेंबरमध्ये एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. यातील तीनपैकी दोघांना पोलीस पथकाने अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.

Web Title: Two arrested in Udgir, Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.