ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:08+5:302021-03-20T04:18:08+5:30
लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना ...

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!
लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या पुन्हा घटली असून, मोजक्याच काही गाड्या पुणे, मुंबई, औरंगाबादला धावत आहेत. त्यातही प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने बस पूर्णक्षमतेने धावत नसून, डिझेलचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.
लातूर जिल्ह्यातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, शिर्डी, अहमदाबाद, गोवा आदी शहरांसाठी ट्रॅव्हल्स धावतात. कोरोनाच्या आधी दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय अडचणीत आला. दरम्यान, गत काही महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने बस पुन्हा पूर्ववत झाल्या होत्या. त्यातही निर्बंध असल्याने दररोज ३०० हून अधिक धावणाऱ्या बसची संख्या ६० वर पोहोचली आहे. आर्थिक उत्पन्न घटल्याने बँकांच्या वतीने हप्त्यासाठी वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
गाडी रुळावर होती; पण...
कोरोनापूर्वी ट्रॅव्हल्स व्यवसायाची परिस्थिती चांगली होती. लातूर जिल्हाभरातून दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. परिणामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुक करणारे, चालक-वाहक या सर्वांवर आर्थिक संकट कोसळले. बँकांचे हप्ते थकल्याने अनेकांनी बस विकल्या आहेत, तर सध्या ज्या ट्रॅव्हल्स चालू आहेत त्यांनाही डिझेलचा खर्च निघणे अवघड झाले आहे. एकंदरीत कोरोनाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे.
कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दररोजचा खर्च मिळणेही अवघड झाले आहे. हप्त्यांसाठी बँकांचा तगादा सुरू असून, उत्पन्न घटल्याने हप्ते भरणेही जिकिरीचे झाले आहे.
- सोमनाथ मेडगे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक
कोरोनापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरांसाठी बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे बस उभ्याच राहिल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यातून आता केवळ ६० ते ७० बस दररोज धावत आहेत, त्यांनाही परवडेनासे झाले आहे.
- जगदीश स्वामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक
कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. अनेकांना तर हप्ते भरणेही अवघड झाले. त्यातच बँकांचा तगादा चालूच आहे. काेरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हप्ता भरणेही अवघड झाले आहे. शासनाने ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी साहाय्य करण्याची गरज आहे.
- एजाज मनियार, ट्रॅव्हल्स व्यावसायिक