ट्रेलर-दुचाकीची समोरासमोर जाेराची धडक; युवक जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: November 6, 2023 19:10 IST2023-11-06T19:10:01+5:302023-11-06T19:10:29+5:30
लातूर-नांदेड महामार्गावरील टेंभूर्णीनजीकची घटना

ट्रेलर-दुचाकीची समोरासमोर जाेराची धडक; युवक जागीच ठार
अहमदपूर (जि. लातूर) : ट्रेलर आणि दुचाकीची समाेरासमाेर जाेराची धडक झाली असून, या अपघातात २१ वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. ही घटना अहमदपूर शहरानजीक लातूर-नांदेड महामार्गावरील टेंभुर्णी गावानजीक साेमवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात साेमवारी सायंकाळच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या टेंभुर्णी गावालगत लातूर-नांदेड महामार्गाचा बाह्यवळण रस्ता गेला आहे. या महामार्गावर साेमवारी साकळी ८:३० वाजेच्या सुमारास प्रथमेश गंपले (वय २१) हा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर बास्केट बॉलचा सराव करून घराकडे येत हाेता. दरम्यान, त्याच्या एका मित्राने मोबाइलवर काॅल करून त्याच्या घराकडे बोलाविल्याने ताे दुचाकीवरून (एम.एच. २४ बी.सी. ८६३८) सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेला मार्ग साेडून काम सुरू असलेल्या मर्गावरून भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने जात हाेता.
यावेळी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणारा ट्रेलर क्रमांक (एम.एच. १६ ए.ई. ७७३३) विरुद्ध दिशेने लातूरकडे येताना टेंभुर्णी गावानजीक पुलावर समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात २१ वर्षीय युवक प्रथमेश गंपले यांच्या डोक्याल्या जबर मार लागल्याने ताे जागीच ठार झाला. अहमदपूर शासकीय ग्रामीण रुग्णालयातील डाॅक्टरांच्या माहितीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात साेमवारी सायंकाळच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ वैजनाथ संमुकराव हे करत आहेत.