मोठ्या भावासमोर खेळताना चिमुकले बहीण-भाऊ विहिरीत पडले; तासाभराने सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:19 IST2025-04-11T13:15:17+5:302025-04-11T13:19:20+5:30

आम्ही खेळून येतो, आईला सांगून निघालेली बहीण-भाऊ विहिरीत पडली, तासाभराने सापडले मृतदेह

Toddler brother and sister fall into well while playing in front of older brother; bodies found an hour later | मोठ्या भावासमोर खेळताना चिमुकले बहीण-भाऊ विहिरीत पडले; तासाभराने सापडले मृतदेह

मोठ्या भावासमोर खेळताना चिमुकले बहीण-भाऊ विहिरीत पडले; तासाभराने सापडले मृतदेह

औसा (जि. लातूर) : शहरातील तालेबुऱ्हाण भागात दुपारी ४ वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या आलिना समीर शेख (वय ६), उस्मान समीर शेख (वय ३, रा. औसा) या दोन चिमुकल्या बहीण, भावाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेनंतर जवळपासच्या नागरिकांनी बोरीच्या फांदीला दोरखंड बांधून विहिरीत सोडले असता दोघांचेही मृतदेह हाती लागले.

शहरातील नवीन वस्ती तालेबुऱ्हाण येथे वास्तव्यास असणाऱ्या समीर शेख हे आइस्क्रीम विकून आपल्या कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आलिना व उस्मान ही भावंडे आपल्या मोठ्या ८ वर्षीय भावासोबत शेजारी असलेल्या विहिरीच्या परिसरात खेळण्यासाठी गेले होते. याठिकाणी मुलांसह नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. चिमुकले खेळत-खेळत विहिरीकडे गेले अन् विहिरीत पडल्याचे मोठ्या भावाने पाहिले. त्यानंतर तो धावत घरी गेला. आईसह आजीला ही घटना सांगितल्यावर शेजारी असलेले नागरिकही तत्काळ मदतीला धावले. तब्बल दीड तासानंतर बोरीच्या फांदीला दोरखंड बांधून पाण्यात टाकले असता, काही वेळेतच मृतदेह हाती लागले. दोघा मयतांवर महावितरणच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानमध्ये रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दफनविधी करण्यात आला.

मृतदेह पाहून आई, वडिलांनी हंबरडा फोडला
दोन चिमुकले आम्ही खेळून येतो म्हणून गेले अन् ते विहिरीत पडले. सदरची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. शेकडो लोक विहिरीच्या कडेला थांबले. मृतदेह बाहेर काढताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला, तसेच उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. वस्तीत असणाऱ्या विहिरीशेजारी नगरपालिकेने किमान कुंपण तरी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Toddler brother and sister fall into well while playing in front of older brother; bodies found an hour later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.