पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, हजारो नागरिकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
By आशपाक पठाण | Updated: December 26, 2025 00:46 IST2025-12-26T00:45:38+5:302025-12-26T00:46:16+5:30
Latur Crime News: औराद शहाजानी येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व वाहनचालकाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकून एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, हजारो नागरिकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
- आशपाक पठाण
औराद शहाजानी (जि. लातूर) - येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व वाहनचालकाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकून एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यावर मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांसह हजारो नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांचा ठाण्यासमोर ठिय्या होता.
औराद येथील इमरान खलीलमिया बेलुरे (वय २२) हा सन २०२२ साली येथील व्यापाऱ्याच्या दुकानात मुनीम होता. त्यांच्याच घरी चोरी झाल्याच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने अटक झाली होती. त्यानंतर या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त व तपास पूर्ण करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर औराद येथील पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी हे सतत संबंधित आरोपीच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन त्रास देत असल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करत संबंधित इमरान बेलुरे याने तेरणा नदी पात्राच्या शेजारी शासकीय वनीकरणांमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी औराद परिसरामध्ये पसरली. घटनास्थळी मोठ्या संख्येने नातेवाईक व समाज बांधव जमले. पोलिस स्टेशनवर आलेल्या या जमावाला औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी के. बी. चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक आर. के. डमाळे यांनी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजेपर्यंत याप्रकरणी कसलीच नोंद पोलिस ठाण्यात नव्हती.
मध्यरात्रीपर्यंत प्रेत झाडावरच
जोपर्यंत संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत प्रेताचा पंचनामा व प्रेत खाली उतरविण्यास विरोध जमावाने विरोध केला. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत संबंधित आत्महत्या केलेल्या तरुणाचे प्रेत झाडालाच लटकत राहिलेले होते. यावेळी पोलिस ठाण्यासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नातेवाइकांच्या जवाबानुसार गुन्हा दाखल होईल
पोलिस उपअधीक्षक कुमार चौधरी म्हणाले, या प्रकरणांमध्ये प्रथम आकस्मिक गुन्हा नोंद केला जाईल. त्यानंतर नातेवाइकांनी दिलेल्या जवाबानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. यासाठी अगोदर मृतदेह काढावा लागेल, पंचनामा करू, त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.
पोलीस रात्री-बेरात्री दारावर लाथा मारायचे
पोलिस अधिकारी व कर्मचारी वारंवार घरी यायचे. रात्री-बेरात्री दारावर लाथ मारायचे. अर्वाच्च बोलायचे, कुठे गेला मुलगा, अशी विचारणा करायचे. दमदाटी करून वारंवार मानसिक छळ करीत होते. या छळाला कंटाळून माझ्या मुलाने आत्महत्या केली. संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. तोपर्यंत आम्ही प्रेत काढणार, दफनविधीही करणार नाही.
- खलील बेलुरे, मयताचे वडील.