कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास
By राजकुमार जोंधळे | Updated: November 1, 2022 18:45 IST2022-11-01T18:44:22+5:302022-11-01T18:45:08+5:30
शेतीत होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत होता

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास
लामजना (जि. लातूर) : सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा वाढणारा डाेंगर, यामुळे एका तरुण शेतकऱ्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना औसा तालुक्यातील अपचुंदा शिवारात ३१ ऑक्टोबर रोजी घडली. महेश दत्ता साठे (वय २८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, शेतीत होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने संकटात सापडल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. मयत शेतकरी महेश साठे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर सोसायटीचे ७५ हजारांचे कर्ज हाेते. शिवाय, मायक्रो फायनस, खासगी सावकारी आणि मोटारसायकलवर, असे एकूण १५ लाखांचे कर्ज हाेते. अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सोयाबीन काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, तणावाखाली असल्याने शेतातील चिंचेच्या झाडाला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असे नातेवाइकांनी सांगितले.
घटनास्थळी अंमलदार गंगाधर सूर्यवंशी, तलाठी चापेकर करंडे यांनी मंगळवारी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, मंगळवार, १ नोहेंबर रोजी हसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पाश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.