Those who could not dig the pits, what will end our politics? | ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार?

ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार?

- धर्मराज हल्लाळे
भोकर (जि. नांदेड) : राजकारणात विचारांची लढाई अपेक्षित आहे, परंतु केंद्रात मिळालेल्या बहुमताने भाजपा अहंकारात बुडाली आहे. विरोधकांना शत्रू समजून संपविण्याची भाषा करू लागली आहे. त्यांना सत्तेची आलेली ही धुंदी जनता विधानसभेत उतरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला राजकारण सोडून आराम करण्याचा सल्ला देतात. अनुभवी ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांचे राजकारणच संपणार म्हणतात, इतकी उन्मत्तपणाची भाषा मतदार सहन करणार नाहीत, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.


‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी घोषणा केली होती, डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. वस्तुस्थिती मात्र भयंकर आहे. राज्यातील सुमारे ९० हजार किलोमीटर राज्यमार्गांपैकी निम्म्याहून अधिक रस्ते उद्ध्वस्त आहेत. राष्ट्रीय महामार्गाचेच चित्र जनतेसमोर मांडतात. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काय? प्रत्येक मतदारसंघात तालुक्यांना, जिल्ह्यांना जोडणाºया रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे.
घोषणा करण्यात पटाईत असलेल्या सरकारने पाच वर्षे जनतेची फसवणूक केली. गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक भाजपा सरकारने गाठला. उद्योगधंदे बंद पडू लागले. नवीन नोकºया निर्माण झाल्या नाहीत. ज्या आहेत त्याही गमवाव्या लागल्या. मराठवाड्यातील औद्योगिक वसाहती मोडकळीस आल्या आहेत, हे या सरकारचे अपयश असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.


भाजपाने वॉटर ग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे, ज्यामुळे मराठवाड्यात कायमच्या दुष्काळमुक्तीचा दावा आहे, हे मोठे काम नाही का?
निवडणुकीच्या तोंडावरची ही घोषणा आहे. कथनी-करणीत फरक आहे. ऊर्ध्व पैनगंगा सिंचन प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याला, त्यात नांदेड जिल्ह्यात मिळते. ते पाणी इतरत्र वळविण्याचा घाट सरकारने घातला आहे. ज्यामुळे १५ हजार हेक्टरवरील सिंचन क्षेत्राचे वाळवंट होईल.


दिवंगत नेते शंकरराव चव्हाण

यांनी जायकवाडीसारखा प्रकल्प मराठवाड्याला दिला. ऊर्ध्व पैनगंगा, विष्णुपुरी, मांजरा, तेरणा हे सर्व प्रकल्प काँग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीने द्योतक आहे. काय काम उभे राहिले, हे जनतेसमोर आहे. फडणवीस सरकारच्या निव्वळ घोषणा आहेत. कोटींची उड्डाणे आहेत. एक कालवा जरी केला असेल तर त्यांनी सांगावे, असा प्रतिसवाल अशोक चव्हाण यांनी केला.


शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत मिळत आहे अन् तुम्ही म्हणता वाºयावर सोडले?
कर्जमाफी जाहीर केली. सर्वांपर्यंत लाभ पोहोचले का? काही जणांना लाभ मिळाले की त्याचीच जाहिरातबाजी करायची. तुटपुंज्या मदतीचे काय बोलतात? शेतमालाच्या हमीभावाचे काय झाले, दुप्पट उत्पन्न करण्याचे काय झाले? फडणवीसांनी केलेली ही फसवणूक आहे. तूर, हरभरा, मूग खरेदी केंद्रांवरील रांगा आणि शेतकºयांचे हाल सर्वांसमोर आहेत. अनुदानासाठी जाचक अटी टाकल्या. ज्यामुळे लाखो शेतकºयांना अनुदानच मिळाले नाही.


झाकली मूठ सव्वा लाखाची कोणासाठी?
लोकसभा निकालानंतर मी विधानसभेला उभे राहू नये. झाकली मूठ सव्वा लाखाची, असे माझ्याबद्दल बोलणाºया नेत्याचाच राजकीय ‘विनोद’ झाला आहे. त्यांना त्यांच्याच पक्षाने झाकली मूठ सव्वा लाखाची सल्ला दिला असावा. कोणी उभे राहावे, कोण निवडून येणार अन् कोण मुख्यमंत्री होणार हे जनता ठरवील. मी सत्तेत असो, नसो सतत लोकांमध्ये आहे. मला आरामाची गरज नाही. उलट भाजपाने माझ्यासमोर थकलेला उमेदवार उभा केला आहे. त्यांना मतदार नक्कीच आराम देतील.


सत्ताधाºयांनी पाच वर्षांत काहीच केले नाही का?
नक्कीच केले आहे. आश्वासने दिली. भरमसाठ घोषणा केल्या. निवडणुकीच्या तोंडावर एक महिन्यात दोन हजार शासन निर्णय काढले. अंमलबजावणी शून्य असलेले हे सरकार कोणत्याही घटकाला खूश करू शकले नाही. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार सर्वांना अडचणीत आणले आहे आणि हेच त्यांचे काम राहिले आहे. पाच वर्षात आधार कार्ड बनवा, तो मोबाईलला, पॅनला लिंक करा. बँकेत पैसे कमी ठेवले तर दंड भरा. रोजगार मागू नका, स्टेशनवर फ्री वायफाय घ्या, ही यांची कामे आहेत.

Web Title: Those who could not dig the pits, what will end our politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.