लातूर : काेराेना काळात माेठ्या प्रमाणावर माेबाईल आणि ऑनलाईन व्यवहाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी, तरुणाईत स्मार्टफाेनची माेठी क्रेझ आहे. हातात न बसणारे, खिशात न मावणारे माेबाईल चाेरट्यांना लंपास करण्यासाठी साेयीचे ठरले आहेत. गत दाेन वर्षांत प्रत्यक्ष माेबाईल चाेरीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याबाबत संबंधित पाेलीस ठाण्यात माेबाईल हरवल्याच्या तक्रारीच नाेंदवून घेण्यावर अधिक भर असल्याचा प्रकार समाेर आला आहे.
रस्त्याने कानाला माेबाईल लावून बाेलत जाणाऱ्यांचा माेबाईल पळविणारी टाेळीच सक्रिय आहे. काहींच्या हातातील माेबाईल माेटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांकडून हिसकावत पळ काढला जात आहे. स्मार्टफाेनचा आकार माेठा असल्याने बहुतांशजणांचा माेबाईल खिशात बसत नाही. मग हातात ठेवण्याशिवाय पर्याय नसताे. अशावेळी चाेरट्यांना ते माेबाईल लंपास करण्यासाठी फार कष्ट लागत नाहीत. सहज चालत-चालतच माेबाईल पळविले जात आहेत.
चाेरी नव्हे, गहाळ म्हणा...
लातुरात माेबाईल चाेरीच्या घटना माेठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
अनेकजण माेबाईल चाेरीकडे दुर्लक्ष करत तक्रार देत नाहीत. दिली तर ताे माेबाईल हाती लागत नाही, हा अनुभव तक्रारदारांना आहे.
माेबाईल चाेरी नव्हे, हरवल्याची तक्रार देण्याबाबत काही पाेलीस कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. परिणामी, माेबाईल चाेरीला गेल्याची नाेंदच नसते.
बाजारातील गर्दीत माेबाईल सांभाळा...
लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, गंजगाेलाइतील बाजारपेठ, महत्मा फुले भाजी मंडई, अडत लाईन, रयतू बाजारात माेबाईल चाेरीच्या घटना घडतात.
शिवाय, ग्रामीण भागातील आठवडी बाजारात, बसमध्ये चढताना माेबाईल लंपास करण्याच्या घटना घडतात.
रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि रस्त्याने जाणाऱ्यांच्या हातातील माेबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढत आहेत.