माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच

By हरी मोकाशे | Published: February 26, 2024 07:10 PM2024-02-26T19:10:09+5:302024-02-26T19:10:42+5:30

बाजार समितीतील माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

There is no solution to the demands of Mathadi workers; Latur Bazar Samiti remained closed for the third day | माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच

माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच

लातूर : हमालीच्या दरात वाढ करावी, अशी मागणी करीत लातूर बाजार समितीतील माथाडी कामगारांनी बेमुदत संप सुरू केला आहे. तिसऱ्या दिवशीही कुठलाही बैठक अथवा तोडगा न निघाल्याने कामगार आपल्या मागणीवर ठाम आहेत. परिणामी, सोमवारीही बाजार समिती बंद राहिली. तीन दिवसांत जवळपास ४५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हरभरा, तूर आणि सोयाबीनची सर्वाधिक आवक होत आहे. दररोज एकूण २० हजार क्विंटलपर्यंत आवक होत होती. दरम्यान, बाजार समितीतील माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि सोमवार असे तीन दिवस बाजार समिती बंद राहिली आहे. माथाडी कामगारांच्या मागणीसंदर्भात अद्यापही बैठक झाली नाही अथवा कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे व्यवहार बंदच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

हमालीचे दर वाढवावेत...
हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून आम्ही साडेतीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र, निर्णय न झाल्याने संप पुकारला आहे. अद्यापही कुठलीही चर्चा अथवा तोडगा निघाला नाही. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत.
- बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, राज्य माथाडी कामगार.

जिल्हा उपनिबंधकांच्या अखत्यारितील प्रश्न...
हमालीच्या दर वाढीसंदर्भातचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांच्या अंतर्गत येतात. यासंदर्भात त्यांना कळविण्यात आले आहे. अद्याप कुठलीही बैठक झाली नाही. त्यामुळे व्यवहार सुरू झाले नाहीत.
- भगवान दुधाटे, सचिव, बाजार समिती.

पणन कायद्याच्या विरोधात संप...
पणन संचालकांनी कायद्यात दुरुस्त्यासंबंधी हरकती व सूचना मागविल्या होत्या. या कायद्याच्या विरोधात सोमवारी बाजार समितीतील आडते, व्यापाऱ्यांनी लाक्षणिक संप केला. दरम्यान, तीन दिवसांपासून लातूर बाजार समितीत संप सुरू आहे. या कायद्याविरोधात जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणच्या बाजार समित्यांनीही लाक्षणिक संप केला.

Web Title: There is no solution to the demands of Mathadi workers; Latur Bazar Samiti remained closed for the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.