डोळ्यात मिरची टाकून अमानुष मारहाण, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू; सातजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 19:32 IST2023-06-20T19:31:16+5:302023-06-20T19:32:03+5:30
उपचारादरम्यान युवकाचा झाला मृत्यू; सातजणांवर खुनाचा गुन्हा दाखल्

डोळ्यात मिरची टाकून अमानुष मारहाण, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू; सातजणांवर गुन्हा दाखल
औसा (जि. लातूर) : मनात राग ठेवून युवकास घराकडे बोलवून सातजणांनी डोळे, तोंड, नाकात मिरची टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. यातील गंभीर जखमी युवक बळीराम नेताजी मगर (२०) याचा शनिवारी (दि. १७) सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास लातूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणात भादा पोलिस ठाण्यात सातजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी सांगितले.
पाेलिसांनी सांगितले, भादा येथे ३ जून रोजी सकाळी १० वाजता मयतास आरोपीने तुला महत्त्वाचे बोलायचे आहे, असे म्हणून घराकडे नेले. त्या ठिकाणी जमलेल्या सातजणांनी संगनमत करून मयत बळीराम मगर याला काठी, दगडाने मारहाण केल्याने त्यांचा हात व पाय फ्रॅक्चर होते. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोळे, तोंड आणि नाकात मिरची घालून जखमी करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निखिल व्यंकट फरताळे, हाणमंत वैजनाथ नंदराम, संतोष वैजनाथ नंदराम, सारिका व्यंकट फरताळे, चंदर भीमराव फरताळे, भागीरथी चंदर फरताळे, वैजनाथ भाऊराव नंदराम यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भादा पोलिस पंचनामा केला असून, रविवारी शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.