घरकामात हातचलाखी; मालकिणीच्या पर्समधून ४ तोळ्यांचा दागिना चोरणारी मोलकरणी अटकेत
By राजकुमार जोंधळे | Updated: February 28, 2023 15:53 IST2023-02-28T15:53:21+5:302023-02-28T15:53:45+5:30
घरात काम करताना हातचलाखी करत पर्समधील दागिना चोरल्याची कबुली आरोपीने दिली

घरकामात हातचलाखी; मालकिणीच्या पर्समधून ४ तोळ्यांचा दागिना चोरणारी मोलकरणी अटकेत
लातूर : घरात पर्समध्ये ठेवलेले चार तोळ्याचे गंठण चोरून नेल्याची घटना लातुरतील प्रकाश नगर येथे घडली होती. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून, गंठण जप्त केले आहे.
गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्याच घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांना संशय आला. त्या महिलेला ताब्यात घेत विश्वासाने विचारपूस करण्यात आली. घरात काम करताना पर्समध्ये ठेवलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरी केल्याची कबुली मोलकरणीने पोलिसांना दिली. तिच्याकडून सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले. तपास पोलीस अंमलदार भोसले करीत आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, पोलीस अंमलदार भिमराव बेलाळे, गोविंद चामे, बाळू भोसले, ज्ञानेश्वर काळगे, राम जाधव, पिराजी गोडबोले, महीला पोलीस अमलदार आचार्य यांच्या पथकाने केली.