रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By हरी मोकाशे | Published: May 27, 2023 05:31 PM2023-05-27T17:31:38+5:302023-05-27T17:31:49+5:30

नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The four gates of Rena project opened; The problem of water for sugarcane and livestock has been solved | रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला

रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला

googlenewsNext

रेणापूर : उन्हाळी पीक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांकडून रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्यानुसार प्रशासनाने शुक्रवारी रेणा प्रकल्पाचे चार दरवाजे १० सेमीने उघडून रेणा नदी पात्रात २९.०४ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीवरील रेणापूर, घनसरगाव व खरोळा येथील तीन बॅरेज तुडुंब भरले आहेत. शिवाय, ऊसासह उन्हाळी पीक आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

गत पावसाळ्यात रेणापूर तालुक्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा झाला होता. त्यामुळे प्रकल्पातून अकरावेळा पाणी रेणा नदी पात्रात सोडण्यात आले होते. दरम्यान, आता बाराव्यांदा पाणी सोडण्याची वेळ आहे. दरम्यान, रेणा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

रेणा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील घनसरगाव, रेणापूर व जवळगा (खरोळा) हे तिन्ही बॅरेजेस तुडुंब भरले आहेत. दरम्यान, नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग ऊस व उन्हाळी पिकांना होणार आहे. तसेच पशुधनास पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

आठवडाभरापूर्वीच पाण्याचे नियोजन...
रेणा मध्यम प्रकल्पातून नदी पात्रात २० मे रोजी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु, घनसरगाव जवळ पुलाचे काम सुरू असल्याने किमान १० दिवस तरी प्रकल्पातून पाणी सोडू नये म्हणून नागरिकांनी नदी पात्रात ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे प्रशासनाने १० दिवसांची मुदत दिली होती. पुलाच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले. नदी पात्रात पाणी असले तरी पुलाचे काम सुरु राहणार आहे.

एकाच वर्षात पाणी सोडण्याची १२ वी वेळ...
आतापर्यंत रेणा प्रकल्पातून १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच वारंवार पाणी सोडावे लागले आहे. पावसाळ्यात प्रकल्पात पाण्याचा ओघ वाढत राहिल्याने प्रकल्पाचे कधी दोन, कधी चार तर कधी सहा दरवाजे १० सेमीने उघडले गेले होते. जूनमध्ये दोनदा, ऑगस्टमध्ये एकदा, सप्टेंबरमध्ये पाचदा तर ऑक्टोबरमध्ये चारदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आता ही बारावी वेळ आहे.
- श्रीनाथ कुलकर्णी, शाखा अभियंता.

 

Web Title: The four gates of Rena project opened; The problem of water for sugarcane and livestock has been solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.