दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर

By संदीप शिंदे | Updated: February 21, 2025 19:59 IST2025-02-21T19:58:28+5:302025-02-21T19:59:59+5:30

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन दिशाने दिला दहावीचा पेपर; शिक्षक, ग्रामस्थांनी दिला धीर

The first paper of 10th standard and the support of her father was lost; Disha bravely gave the paper to fulfill her dream | दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर

दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर

लातूर : दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या आदल्या रात्री हे दु:खदच. मात्र, हे दु:ख सहन करीत औसा तालुक्यातील भादा येथील दिशा नागनाथ उबाळे हिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रूनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी दिशा नागनाथ उबाळे हिचा दहावी परीक्षेसाठी औसा शहरातील अजीम हायस्कूल येथे बैठक क्रमांक आला होता. मात्र, गुरुवारी रात्री ७.३० वाजता तिच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्कार असल्याने दहावीचा पेपर देण्याच्या मन:स्थितीत दिशा नव्हती. 

मात्र, शाळेतील शिक्षक शिवलिंग नागापुरे यांनी लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्याशी संवाद साधून दु:खद प्रसंग सांगितला. त्यांनी स्वत: विद्यार्थिनीशी संवाद साधून परीक्षेचे महत्त्व सांगितले. वडिलांच्या निधनाचे दु:ख उराशी बाळगत अंत्यदर्शन घेऊन दिशाने शुक्रवारी औसा येथील केंद्रावर मराठीचा पेपर दिला. गावातील प्रेमनाथ लटुरे, बालाजी शिंदे, औसा येथील सुलेमान शेख, सुरेश मेटे यांनीही दिशाचे मनपरिवर्तन केले. परीक्षा सुरू झाल्यावर दिशाचे वडील नागनाथ उबाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिशाच्या कुटुंबात आजी, आई, एक भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The first paper of 10th standard and the support of her father was lost; Disha bravely gave the paper to fulfill her dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.