आईला सतत होणारी मारझोड पहावली नाही, वडिलाचा मुलानेच चाकूने भोसकून केला खून
By राजकुमार जोंधळे | Updated: June 5, 2023 13:49 IST2023-06-05T13:48:45+5:302023-06-05T13:49:51+5:30
जन्मदात्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी मुलगा हा घटनास्थळावरून पसार झाला होता.

आईला सतत होणारी मारझोड पहावली नाही, वडिलाचा मुलानेच चाकूने भोसकून केला खून
लातूर : आईला मारहाण करणाऱ्या वडिलाचा पोटच्याच मुलाने चाकूने भोसकून, सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना लातुरातील रेणुका नगरात शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनतंर पसार झालेल्या मुलास पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील आंबेजोगाई रोडवरील आंबा हनुमान मंदिराच्या पाठीमागे रेणुका नगरात जानकर यांच्या घरी भाड्याने क्षीरसागर कुटुंब राहत होते. दरम्यान, फिर्यादी मंगल क्षीरसागर (वय ४३) यांना पती सोमनाथ मधुकर क्षीरसागर (वय ४५) हा सतत मारझोड करत होता. शनिवारी त्याने पत्नीला मारहाण सुरु केली. यावेळी तेवीस वर्षीय मुलगा रोहित हा घरातच होता. आईला होत असलेली मारहाण पाहून त्याला राग आला. डोळ्यासमोर होणारी मारहाण सहन झाली नाही. रागाच्या भरात घरात असलेला चालू रोहितने हाती घेतला आणि जन्मदात्यावर सपासप वार केले. चाकूने भोसकून त्याने वडिलांचा खून केला. घटनास्थळावरून तो पसार झाला. यावेळी जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळलेल्या पतीला पत्नी मंगल यांनी तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जखमी झालेल्या सोमनाथ यांना मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, पोलिस उपनिरीक्षक अतुल डाके, पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगल सोमनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर याच्याविरोधात गुरनं. ४०२ / २०२३ कलम ३०२ भादंवि प्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कराड करत आहेत.
सोमवारी पहाटे मुलाला अटक...
जन्मदात्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी मुलगा रोहित हा घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत त्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.