नियंत्रण सुटल्याने २५ फुट खोल खड्ड्यात पडली कार, एकाचा जागीच मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: November 20, 2023 17:50 IST2023-11-20T17:49:22+5:302023-11-20T17:50:47+5:30
निलंगा ते औराद शहाजनी मार्गावर झाला अपघात

नियंत्रण सुटल्याने २५ फुट खोल खड्ड्यात पडली कार, एकाचा जागीच मृत्यू
निलंगा : नातेवाईकांच्या गावाहून परत येत असताना निलंगा-औराद मार्गावर अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने कार २५ फुट खोल खड्डयात आदळल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. रघुनाथ जगन्नाथ गवंडगावे (वय ४६) मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील ताडमुगळी येथील रघुनाथ जगन्नाथ गवंडगावे हे पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत कारने गौर-मसलगा येथून ताडमुगळीकडे निघाले होते. दरम्यान, निलंगा ते औराद शहाजनी मार्गावर सोमवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास गोरोबा उसनाळे यांच्या शेताजवळ गवंडगावे यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार २५ फुट खोल खड्ड्यात आदळली.
यामध्ये रघुनाथ गवंडगावे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. एम.एम. बेग करीत आहेत.