दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; तरुण जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: April 16, 2024 15:28 IST2024-04-16T15:27:37+5:302024-04-16T15:28:12+5:30
उदगीरातील बिदर मार्गावरील घटना

दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; तरुण जागीच ठार
उदगीर (जि. लातूर) : भरधाव वाहनाने एका दुचाकीला जाेराने उडवल्याची घटना उदगीर शहरातील पांढरे मंगल कार्यालयासमाेर बिदर वळण रस्त्यावर साेमवारी रात्री घडली. या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील रहिवासी सोमनाथ तानाजी म्हेत्रे (वय २९) हा लाईट फिटिंगचा व्यवसाय करत असून, ताे साेमवारी आठ वाजण्याच्या सुमारास काम आटाेपल्यानंतर दुचाकीवरुन (एम.एच.२४ बी.सी. ४५९०) गावाकडे निघाला हाेता. दरम्यान, पांढरे मंगल कार्यालयासमाेरील बिदर वळण रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जाेराने उडवले. या अपघातात साेमनाथच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी भेट दिली. साेमनाथ म्हेत्रे याचा मृतदेह उदगीर शहरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला असून, याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती.