टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: February 27, 2025 18:19 IST2025-02-27T18:19:12+5:302025-02-27T18:19:45+5:30
शिरूर ताजबंद येथील राष्ट्रीय महामार्गावरील घटना

टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू
अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून जाणाऱ्या ३६१ राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पवन भानुदास डुरे (वय ३०), रणजित चंद्रकांत मुंढे (वय २४, दोघेही रा. हगदळ, ता. अहमदपूर) अशी मृत युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील हगदळ येथील पवन भानुदास डुरे व रणजित चंद्रकांत मुंढे हे दोन युवक कामानिमित्त दुचाकीवर शिरूर ताजबंद येथे गेले होते. तेथील आपले काम आटोपून ते लातूरकडे ३६१ राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी लातूरहून नांदेडकडे येत असलेला मालवाहू टेम्पो (एम.एच २६, बीई. ७५३४) व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी दूरवर फरफटत गेल्याने आग लागली. यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. अपघाताची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अहमदपूरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत युवकांवर हगदळ येथे गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हगदळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार...
शिरूर ताजबंद येथील राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-दुचाकीच्या अपघातात पवन डुरे, रणजित मुंढे या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.