टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: March 4, 2023 00:31 IST2023-03-04T00:30:52+5:302023-03-04T00:31:13+5:30
या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार
जळकोट (जि. लातूर) : शिरुर ताजबंद-मुखेड राज्य महामार्गावरील उमरगा पाटी (ता. जळकोट) येथे मोटारसायकल आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद-मुखेड महामार्गावर उमरगा (रेतू) पाटीनजीक भरधाव पिकअप टेम्पो (एमएच २६ - एच ९५५४) आणि मोटारसायकलची (एमएच १२ - एडी ६१०८) समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात हमीद चंदूलाल सय्यद (वय ४५, रा. डोंगरगाव बावलगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि आनंद गोविंदराव कदम (रा. बाबळगाव, ता. अहमदपूर जि. लातूर) हे दोघे जागीच ठार झाले. तर पिकअप टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जळकोट येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
उमरगा पाटीनजीक सतत होतात अपघात...
जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू पाटीनजीक सतत अपघातांच्या घटना घडत आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड महामार्गावर सर्वाधिक अपघात याच उमरगा पाटीनजीकच्या परिसरात झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. वाहनांचा अनियंत्रित वेग आणि अपघात प्रवणक्षेत्र असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.
अपघातानंतर टेम्पो रस्त्यावरच उलटला...
महामार्गावरील उमगरा पाटी येथे झालेल्या भीषण अपघातात भरधाव टेम्पो रस्त्यावरच उलटला. टेम्पोतील ९ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अन्य मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात टेम्पो आणि मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.