तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर ६४० कर्मचारी साहित्यासह रवाना झाले आहेत. निवडणुकीसाठी १३५ केंद्राध्यक्ष, १३५ मतदान केंद्र अधिकारी, १३५ सेवक, १३५ अंगणवाडी मदतनीस, १३५ आशा स्वयंसेविका, १६ झोनल अधिकारी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड यंत्रणा सज्ज आहे. त्यात थर्मलगन, ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर आहे. तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी दाखल झाली आहे. यात १३५ पोलीस, एक डीवायएसपी, एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षकांसह सर्व यंत्रणा आहे. ही सर्व यंत्रणा मतदान केंद्रावर गुरुवारी दाखल झाली असून, त्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, आदी उपस्थित होते.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात जमा होणार मशीन...
सर्व यंत्रणा नांदेड रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होत आहे. त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन जमा होणार आहेत. याबाबतचे सर्व नियोजन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी ४५ खासगी वाहने वापरण्यात येणार आहेत. २० खासगी बसेस, २० जीप व ५ विविध विभागांच्या गाड्या आहेत. ठरलेल्या मार्गाप्रमाणे मतदानानंतर मशीन येथे आणल्या जाणार आहेत.
व्यक्तिगत लढाईवर भर...
तालुक्यात एकूण ७०९ उमेदवार असून, सर्वांनी कंबर कसली आहे. बुधवारपासून व्यक्तिगत लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून आले. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील रंगत कमी झाली आहे. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी आपण स्वतः कसे जिंकू, याकडे अधिक लक्ष केंद्रित केले.