छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा
By हरी मोकाशे | Updated: November 28, 2022 18:37 IST2022-11-28T18:36:53+5:302022-11-28T18:37:39+5:30
सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने रविवारी सकाळी कुमठा येथे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुध्द गुन्हा
लातूर : ट्रॅक्टर व जेसीबी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून विवाहितेस सतत शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केली. सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने रविवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुमठा येथे घडली. विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अल्लू वडगाव येथील कोमल बिरादार (१९) हिचा विवाह तालुक्यातील कुमठा येथील अजय नरसिंग बिरादार यांच्यासोबत मे २०२२ मध्ये झाला होता. लग्नानंतर मयत काेमल बिरादार हिच्या सासरच्या मंडळींनी ट्रॅक्टर, जेसीबी घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले.
सततच्या त्रासाला कंटाळून तिने रविवारी सकाळी कुमठा येथे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी उदगीरातील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी उदगीर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पती अजय नरसिंग बिरादार, सासरा नरसिंग बिरादार, सासू सरोजा नरसिंग बिरादार, दीर आशितोष बिरादार, नणंद अनुजा राहुल कुंडले या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ हे करीत आहेत.