लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल झाले आहेत. मेथी, पालक, शेपूच्या तीन पेंढ्या १० रुपयांमध्ये मिळत असल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तूर डाळ, चनाडाळ आणि मसूर डाळीचे भाव या आठवड्यात स्थिर आहेत. मूग डाळ १२० रुपयांच्या घरात गेली आहे.
ऐन दिवाळीच्या सणात खाद्यतेल, चनाडाळीने भाव खाल्ला होता. दिवाळीनंतर अचानकपणे भाजीपाल्यांचे भाव शंभरीच्या घरात होते. दिवाळीनंतर दोन आठवडे साखरेचे दर स्थिर होते. आता प्रति किलो २ ते ३ रुपयांनी साखर महागली आहे. भाजीपाला आवाक्यात असून, भेंडी ३५, पत्तागोबी २५, फुलकोबी २५, गवार ५०, टोमॅटो २० रुपये, बटाटे ३० ते ३५ रुपये, मेथी, पालक, शेपू तीन पेंढ्या १० रुपये, चुका ४० रुपये, कांदा पेंढी ५ ते ८ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, हिरवी मिरची २५ रुपये, कोथिंबीर १० रुपयांना पेंढी. वांगी १५ रुपये, दोडका ४० रुपये, भोपळा २० रुपये नग, वरणा ४० रुपये, गाजर ३० रुपये किलो, करडई भाजी ३० रुपये, हरभरा भाजी ५० रुपये, काकडी प्रति किलो ३० रुपये दराने मिळत आहे.
किराणामध्ये खाद्यतेल १२० रुपये किलोने मिळत आहे. साखर ३५ वरून ३८ वर गेली आहे. खोबरं १८०, शेंगदाणा ९० ते १००, पोहे ४० रुपये, तांदूळ ३५ ते ५०, चुरमुरे प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने मिळत आहे. गत आठवड्यात किराणा मालाचे भाव वधारले असून, भाजीपाला मात्र घसरला आहे.
किराणा मालाच्या डाळीमध्ये मूगडाळ आणि तूरडाळ सर्वाधिक महाग आहे. प्रति किलोला १२० रुपयांचा दर असून, चनाडाळ ७० रुपये, मसूर डाळ १०० रुपये प्रति किलो आहे. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वधारल्या आहेत. ९५ रुपयांवरून १२० रुपये प्रतिकिलो भाव पोहोचला आहे. यातून महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे.
एकिकडे भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. तर दुसरीकडे साखरेचा दर मात्र वधारला आहे. दिवाळीत ३४ ते ३५ रुपये किलो मिळणारी साखर आता ३८ रुपये दराने मिळते.
किराणामध्ये साखरेबरोबर खाद्यतेल महागले आहे. सर्वाधिक साखर, खाद्यतेल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मागणी असते. याच वस्तूंचे भाव गत आठवड्यात वधारले आहेत. काहींचे भाव मात्र स्थिर आहेत.
-गोविंद खंडागळे,
व्यापारी
सध्या थंडीचे दिवस असल्याने फळांना मोठी मागणी आहे. सफरचंद, चिकू, पेरू, सीताफळ, डाळिंब व इतर फळांची मोठी आवक होत आहे. प्रति किलो १०० रुपयांच्या घरात दर आहेत. सफरचंद ८० ते १०० रु., पेरु ३० ते ४० रुपये.
- बाबा शेख,
फळविक्रेता
दिवाळीनंतर भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले होते. आता दोन आठवडे झाले भाव घसरले आहेत. सध्या २० ते ३० रुपये दराने प्रति किलो भाजीपाला मिळू लागला आहे. मेथी, पालक, शेपूचे भाव तर मातीमोल झाले आहेत.
- भीमा शिंदे,
भाजीपाला विक्रेता